दिव्याच्या ड्यू ड्रॉप स्कूलमध्ये अभिनव असा डोळस उपक्रम

ठाण्यातील दिवा येथील ड्यू ड्रॉप स्कूल या शाळेनं अभिनव असा डोळस उपक्रम राबवला आहे. शिक्षणात विचारशक्ती प्रगल्भ होऊन विद्यार्थ्यांच्या मेंदूचाही विकास व्हावा या हेतूनं चक्क डोळ्यांवर पट्टी बांधून डोळस विद्यार्थ्यांना पंचेंद्रियांचा विकास अभ्यासाचे धडे दिले जात आहेत. या उपक्रमात ५ शाळा सहभागी झाल्या होत्या. शिक्षण हे परिवर्तनाचं माध्यम असलं तरी आजची शिक्षण पध्दती केवळ घोकमपट्टी न राहता विद्यार्थ्याची बौध्दीक आणि शारिरीक क्षमता वृध्दींगत होणं गरजेचं आहे. हाच दुवा पकडून जागतिक विज्ञान दिनानिमित्त विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं. सहभागी विद्यार्थ्यांना मानवी शरीरातील मेंदूमुळे होणा-या बौध्दीक क्षमतेच्या वाढीबाबत आकलन करून डाव्या आणि उजव्या मेंदूबाबत विश्लेषण करण्यात आलं. बहुतांश जण डाव्या मेंदूचा वापर करतात अशांचा उजवा मेंदू क्रियाशील करण्यासाठी येथील शिक्षक वृंदांनी अंध व्यक्तीप्रमाणे चक्क विद्यार्थ्यांच्या डोळ्यावर पट्टी बांधून शिक्षणाचे धडे दिले. मेंदूचे व्यायाम शिकवताना म्युझिक थेरपीचा आणि इतर गंध, रंग, रूप ओळखण्याचे कसब विद्यार्थ्यांना शिकवण्यात आलं. परदेशात अशाप्रकारचे तंत्र फारच पुढे गेले आहे. तेव्हा आपल्या देशातही प्राथमिक स्तरावर हा उपक्रम राबवण्यास सुरूवात करण्यात आली आहे. या उपक्रमात विद्यार्थी डोळे बंद करून अथवा डोळ्यांवर पट्टी बांधून फळ्यांवर दोन्ही हातांनी लिहित होते. डोळ्यावर पट्टी असतानाही सायकल चालवणं, स्केटींग करणं तसंच शाळेच्या पहिल्या माळ्यापर्यंत चालत जाणं अशा प्रकारच्या क्रिया लिलया करत होते. गेली ५ वर्ष सराव करत असल्यानं घरातील कामंही डोळे मिटून करते असं खुशी माळी या विद्यार्थिनीनं सांगितलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading