दादोजी कोंडदेव क्रीडा संकुलाला आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांच्या दर्जाचे बनविण्याच्या प्रकल्पाची आयुक्तांनी केली पाहणी

दादोजी कोंडदेव क्रीडा संकुलाला आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांच्या दर्जाचे बनविण्याचा प्रकल्प गेल्या महिन्यापासून सुरू झाला आहे. त्याची पाहणीही आयुक्त अभिजीत बांगर यांनी केली. आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळण्यासाठी तसेच, लाईव्ह एच डी प्रक्षेपण करण्यासाठी 3000 LUX क्षमतेइतकी प्रकाशव्यवस्था तयार केली जात आहे. त्यासाठी चार भव्य खांब उभारले जात आहेत. एका खांबावर प्रत्येकी १०२ एलईडी दिवे असतील. त्याचा खर्च १८ कोटी रुपये असून जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत काम पूर्ण होणार आहे. या कामात आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळाच्या सर्व निकषांची सातत्याने पडताळणी करावी अशी सूचना आयुक्तांनी केली. स्टेडियममध्ये, गळतीमुळे खराब झालेले छत बदलण्याचे कामही सुरू आहे. सहा कोटी रुपये खर्चून बांधण्यात येत असले हे छत, तसेच, प्रेक्षागृहातील १०० पत्रकार बसू शकतील अशा प्रेस बॉक्सची जागाही त्यांनी पाहिली. या कामाच्या प्रगतीचा आढावा आयुक्तांनी घेतला. तसेच, दिलेल्या मुदतीत उत्तम दर्जाचे काम व्हायला हवे, हेही आयुक्तांनी पुन्हा स्पष्ट केले. त्यानंतर आयुक्तांनी शूटिंग रेंज, सय्यद मोदी बॅडमिंटन प्रशिक्षण केंद्र, अद्यावत व्यायामशाळा यांची पाहणी केली. मीनाताई ठाकरे चौक ते के. व्हीला तसेच सेंट्रल मैदान – शनी मंदिर – जेल नाका या भागात वाहतूक कोंडी होते. ही कोंडी सोडवून वाहनांना थेट कळव्याकडे जाता यावे यासाठी पुलाची निर्मिती करण्यात येत आहे. ‘मिसिंग लिंक’ असलेल्या के. व्हीला ते साकेत या ६७६ मीटरच्या नवीन पुलाचे काम सुरू झाले आहे. त्याचा खर्च सुमारे ७५ कोटी आहे. त्याचीही पाहणी आयुक्तांनी केली. या पुलाचे ३५ टक्के काम झाले असून २४३ प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन बाकी आहे. पुनर्वसन जलद झाल्यास हे काम डिसेंबर २०२३ मध्ये पूर्ण होईल. के. व्हीला जुन्या पुलाखाली नाल्यात कचरा अडकतो आणि परिसरात पावसाळ्यात खूप त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे हा पुल पाडून नवीन पुलाचे काम सुरू होणार आहे. या दोन्ही कामांचे नियोजन ती एकत्र संपतील अशा पद्धतीने करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading