तुर्फेपाडा येथील झोपडपट्टी धारकांच्या पुनर्वसनासाठी वंचित बहुजन आघाडीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

तुर्फेपाडा येथील झोपडपट्टी धारकांच्या पुनर्वसनासाठी वंचित बहुजन आघाडीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. घोडबंदर रस्त्यावरील तुर्फेपाडा येथे ब्रह्मांड फेज २ चं काम सुरू आहे. या ठिकाणी असलेल्या शिवनेरी इमारतीजवळील मोकळ्या शासकीय भूखंडावर पत्र्यांची बेकायदा घरं उभारण्यात आली आहेत. याच झोपड्यांना ३ जानेवारी रोजी शंकर म्हात्रे नावाच्या व्यक्तीनं आग लावली होती. त्या आगीत ५५ झोपड्या जळून खाक झाल्या होत्या. याप्रकरणी शंकर म्हात्रेला अटक करण्यात आली आहे. पण रहिवाशांना कोणत्याही प्रकारचं अर्थसहाय्य देण्यात आलं नाही. तलाठ्यांनी पंचनामा केला असला तरी ॲट्रोसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल झाल्यानंतर तहसिलदार आणि समाजकल्याण अधिका-यांनी पंचनामा करून अत्याचारग्रस्तांचे पुनर्वसन करावे अशी तरतूद असतानाही कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नसल्यानं रहिवाशांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. ठाणे रेल्वे स्थानकासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून या मोर्चाची सुरूवात झाली. हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला असताना आंदोलकांनी तिथे काही काळ धरणं आंदोलन केलं. तसंच मोर्चेक-यांच्या वतीनं जिल्हाधिका-यांना निवेदनही देण्यात आलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading