डोंबिवलीतील कोपर पुलासह विविध उपक्रमांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा

कोरोनाचा धोका संपलेला नाही. प्रत्येकाने या काळात आपली जबाबदारी ओळखून वागले पाहिजे. प्रार्थनास्थळे उघडणार आहोत. त्याचबरोबरच आरोग्य मंदिरे देखील आवश्यक आहेत. ही आरोग्य मंदिरे उघडल्याबद्दल जनता आपल्याला आशिर्वाद देईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केले. डोंबिवलीतील कोपर पुलाच्या लोकार्पणसह कल्याण डोंबिवली महापालिकेच्या विविध उपक्रमांचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी डोंबिवली मधील कोपर उड्डाणपूलाचे लोकार्पण, कल्याणमधील बाई रुक्मिणीबाई रुग्णालय प्राणवायु निर्मिती प्रकल्प आणि अत्याधुनिक शस्त्रक्रियागृह, ह. भ. प. सावळाराम महाराजा संकुलातील प्राणवायु निर्मिती प्रकल्प, शास्त्रीनगर रुग्णालयातील अत्याधुनिक शस्त्रक्रियागृह, आय वॉर्ड आणि महाराष्ट्र नगर येथील नागरी आरोग्य केंद्र, टिटवाळामधील मांडा येथील स्व. गोपीनाथ मुंडे अग्निशमन केंद्र, तेजस्विनी बस आणि कल्याण डोंबिवली शहर दर्शन बस आणि आंबिवली येथील जैवविविधता उद्यान या प्रकल्पांचे लोकार्पण झाले. कोरोनामुळे गेले दीड ते दोन वर्षाचा काळ कठीण होता. जग ठप्प झाले असले तरी लोकांच्या हिताची कामे पूर्ण केल्याबद्दल महापालिका प्रशासनाला धन्यवाद देत चांगल्या गोष्टींचे आणि कामांचे कौतुक झालंच पाहिजे असं मुख्यमंत्री म्हणाले. कोवीड काळात केलेल्या कार्याबद्दल कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला मिळालेला कोवीड इनोव्हेशन अवॉर्ड हे त्यांनी आपल्या कामाने कमावले आहे. कोवीड निर्बंधानंतर टप्प्याटप्प्याने सर्व गोष्टी सुरू करत आहोत. कोवीड काळात आपण आरोग्य सुविधा उभारण्यावर भर दिला आहे.
ठाण्यातील सहायक आयुक्तांवर फेरीवाल्यांकडून झालेल्या हल्ल्याच्या दुर्देवी घटनेनंतर अधिक कठोरतेने कायद्याची अंमलबजावणी करावी लागणार आहे, आपण जनतेचे सेवक म्हणून काम करत आहोत. कल्याण डोंबिवलीतील नेत्यांनी एकत्र बसून या शहरासाठी काय हवे ते सांगावे. या शहरांसाठी येथील जनतेसाठी रस्ते, पूल, रुग्णालय असे जे जे आवश्यक आहे, ते ते राज्य सरकारकडून दिले जाईल, अशी ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. येथील काही रस्त्यांची जबाबदारी केंद्र शासन घेणार असेल तर राज्य शासन त्याला सहकार्य करेल. केंद्र आणि राज्य मिळून जनतेच्या अपेक्षा पूर्ण करू असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading