ठाण्यामध्ये सिग्नल वडापाव पाठोपाठ आता सिग्नल स्नॅक्स उपक्रम

ठाण्यामध्ये सिग्नल वडापाव पाठोपाठ आता सिग्नल स्नॅक्स उपक्रमही सुरू झाला आहे. बहुतेकवेळा सिग्नलवर लोकं वाहन थांबवून पटकन खाण्यासारखं काही आहे का याचा शोध घेत असतात. अनेकदा यामुळे वाहतूक कोंडीत भर पडते. ठाण्यातल्या काही युवकांनी ही बाब लक्षात घेऊन पोटाला आधार देण्यास पटकन तयार नाश्ता कसा पुरवता येईल याचा विचार करून सिग्नल स्नॅक्स ही नवीन संकल्पना सुरू केली आहे. सध्या तीन हात नाका परिसरात सिग्नल स्नॅक्सनं पोटाला आधार देणारे सँडवीच, चीज सँडवीच, अप्पे, सुकी भेळ, डाएट भेळ सारखे सुटसुटीत पदार्थ उपलब्ध केले आहेत. अमित पाटील आणि भूपेश पाटील या दोन युवकांनी हॉटेल मॅनेजमेंट तसंच एमबीएचं शिक्षण घेऊन ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवली आहे. ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवताना वाहन चालकांना पोटाला आधार तर मिळावाच पण त्यामुळे वाहतूक कोंडी होऊ नये हाही विचार केला आहे. त्यामुळं सिग्नल स्नॅक्सचे पदार्थ हे सिग्नलच्या २०० मीटर अलिकडे उपलब्ध करून दिले जातात. तीन हात नाक्याजवळ ज्ञानसाधना कॉलेज, गुरूद्वारा अशा ठिकाणी सिग्नल स्नॅक्सच्या पदार्थांची डिलीव्हरी दिली जाते. यासाठी ९८२०७ ८८९१० या क्रमांकावर संपर्क साधून ऑर्डर दिली की पदार्थ १० मिनिटात उपलब्ध होतात. सिग्नल स्नॅक्सचे डिलीव्हरी एक्झिक्युटीव्ह एप्रन आणि शेफ कॅप घालून आपल्या दिमतीला उपलब्ध करण्यात आले आहेत. लवकरच सिग्नल स्नॅक्सचं ॲपही उपलब्ध करून दिलं जाणार आहे. स्नॅक्स बॉक्स डॉट कॉम या संकेतस्थळावर भेट देऊन याविषयी अधिक माहिती घेऊ शकता. सिग्नल स्नॅक्सच्या ॲपमुळे ग्राहकाला पदार्थाचे पैसेही ऑनलाईन देता येणार आहेत. हळूहळू हा सिग्नल स्नॅक्स उपक्रम लोकप्रिय होऊ लागला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading