ठाण्यामध्ये नोव्हेंबर अखेरपर्यंत ५.७ टन प्लास्टीक जप्त तर २ लाखांचा दंड वसूल

महापालिकेच्या प्लास्टीक बंदी कारवाईअंतर्गत जवळपास ५.७ टन प्लास्टीक जप्त करण्यात आलं तर २ लाखांचा दंड वसूल करण्यात आला. प्लास्टीक बंदी कारवाई अंतर्गत २०१९-२० च्या आर्थिक वर्षात नोव्हेंबर महिनाअखेर ठाणे महापालिकेनं ५.७ टन प्लास्टीक जप्त केलं असून २ लाखांचा दंड वसूल केला आहे. राज्य शासनानं प्लास्टीक आणि थर्माकोल या अविघटनशील वस्तूंचं उत्पादन, वापर, विक्री, वाहतूक, हाताळणी आणि साठवणूक करण्याबाबत बंदी घातली आहे. यानुसार महापालिकेच्या कार्यक्षेत्रात प्रतिबंधित प्लास्टीक आणि थर्माकोल वस्तूंचं उत्पादन, विक्री, वाहतूक, हाताळणी, साठवणूक करणा-या संस्था-आस्थापनांवर कारवाई करण्यात येत आहे. प्रदूषण नियंत्रण विभागाच्या वतीनं २०१८-१९ या आर्थिक वर्षात २०.५ टन प्लास्टीक जप्त करण्यात आलं आहे. ७२ रहिवासी संस्था आणि सामाजिक संस्थांच्या वतीनं ७२ टन प्लास्टीक जप्त करण्यात आलं असून दंडापोटी ९ लाख ४० हजार इतकी रक्कम वसूल करण्यात आली आहे. २०१९-२० मध्ये नोव्हेंबर अखेरपर्यंत ३०० रहिवासी संस्था आणि सामाजिक संस्थांच्या वतीनं २८९ टन प्लास्टीक जप्त करण्यात आलं आहे. प्लास्टीकप्रमाणे थर्माकोलपासून बनवण्यात येणारी ताटं, वाट्या, कप, ग्लास यांच्या वापराचं प्रमाणही जास्त आहे. या सर्व वस्तू विघटन न होणा-या असून पर्यावरणास हानीकारक आहेत. या वस्तूंची विक्री, वापर बेकायदा असून त्याचा वापर करताना पहिल्यांदा आढळल्यास ५ हजार रूपये, दुस-यांदा आढळल्यास १० हजार रूपये तर तिस-यांदा आढळल्यास २५ हजार रूपये दंड आणि ३ महिने कैदेच्या शिक्षेची तरतूद आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading