ठाण्यात १ एप्रिल पासून ३ ठिकाणी मॉर्निंग वॉक प्लाझा सुरू होणार

शहरातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने तसेच पोस्ट कोव्हिडनंतरच्या काळात सकाळच्या वेळेत व्यायाम आणि मॉर्निंग वॉक अत्यंत महत्त्वाचा घटक बनला असून नागरिकांना सुरक्षितपणे व्यायाम आणि चालता यावे यासाठी ठाण्यात ३ ठिकाणी येत्या १ एप्रिलपासून मॉर्निंग वॉक प्लाझा सुरू करण्यात येणार आहे. आज सायंकाळी महापालिका आयुक्तांनी वाहतूक पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांच्यासमवेत उपवन परिसरात मॉर्निंग वॉक ट्रॅक संदर्भात पाहणी केली. सद्यस्थितीत नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने मॉर्निंग वॉक महत्चाचा विषय आहे. यासाठी शहरातील उपवन परिसरात वाहतूक विभागाशी समन्वय साधून मॉर्निंग वॉक प्लाझाचा निर्णय महापालिका आयुक्तांनी घेतला असून या संदर्भातील ट्रॅकचा पाहणी दौरा आज करण्यात आला. यामध्ये महापौर निवासस्थान ते पायलादेवी मंदिर चौक, वीर बिरसा मुंडा चौक ते काशिनाथ नाट्यगृह आणि धर्मवीर आनंद दिघे प्रवेशद्वार ते वाहतूक पोलीस ऑफिस या ठिकाणी मॉर्निंग वॉक प्लाझा तयार करण्यात येणार आहे. दररोज सकाळी ५.३० ते ८ या कालावधीत हा मॉर्निंग वॉक प्लाझा सुरु राहणार आहे. या वेळात वाहतूक विभागाशी समन्वय साधून या ठिकाणाची वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात येणार आहे. उपवन परिसरात तातडीने मुख्य रस्त्यावरील दुभाजकाचे काम हाती घेवून वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश देतानाच दोन्ही बाजूला पदपथ बांधणे, स्वच्छता, साफसफाई, भिंतीची रंगरंगोटी आणि वृक्ष लागवडही करण्याचे निर्देशही त्यांनी संबंधितांना दिले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading