ठाण्यात १७ सप्टेंबरला स्वच्छता अमृत महोत्सवांतर्गत मानवी साखळी

केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या पंधरवड्यात स्वच्छता अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. यामध्ये ‘इंडियन स्वच्छता लीग’ हा स्वच्छता विषयक देशव्यापी उपक्रम हाती घेण्यात आला आहे. त्या अनुषंगाने ठाणे शहरात वेगवेगळ्या ठिकाणी लोकसहभागातून स्वच्छता विषयक उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या उपक्रमांची सुरूवात १७ सप्टेंबर रोजी उपवन तलाव ते येऊर गाव या भागात मानवी साखळी आणि श्रमदानाने करण्यात येणार आहे. या निमित्ताने शालेय – महाविद्यालयीन विद्यार्थी, युवक, ठाणेकर नागरिक यांच्या सहभागाने ‘ठाणे टायगर्स’ या अभिनव उपक्रमाचाही आरंभ होणार आहे.उपवन तलाव ते येऊर गाव या मार्गावर ७.५ किमी अंतराची सुमारे ७५०० नागरिकांचा सहभाग असलेली मानवी साखळी तयार केली जाणार आहे. हे नागरिक श्रमदान करून त्यांच्या आसपासच्या परिसरातील कचरा गोळा करतील आणि स्वच्छता अमृत महोत्सवात सहभागी होतील. त्याच बरोबर, जनजागृती करणारी बाईक रॅली, स्वच्छता दूतांना विविध सामग्रीचे वाटप, ठाणे स्वच्छता लीगचे उद्घाटन, कचरावेचकांची आरोग्य तपासणी, स्वच्छ खाडी अभियान, शाळा स्वच्छता दिंडी, शालेय विदयार्थी आणि ठाणे महापालिका कर्मचारी यांची चित्रकला स्पर्धा यांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती महापालिका आयुक्तांनी दिली. केंद्र सरकारच्या नगरविकास विभागाने स्वच्छतेचा अमृत महोत्सव साजरा करताना ‘इंडियन स्वच्छता लीग’ हा राष्ट्रीय उपक्रम जाहीर केला आहे. त्यात देशभरातील १८०० हून अधिक शहरे सहभागी होत आहेत. या अनुषंगाने १७ सप्टेंबर रोजीचा सेवा दिवस ते २ ऑक्टोबर रोजीचा स्वच्छता दिवस या पंधरवड्यात स्वच्छता विषयक उपक्रम राबविले जाणार आहेत. यामध्ये लोकसहभागावर भर असून स्वच्छता कार्यात तरूणाईचा सहभाग महत्त्वाचा आहे. त्यासाठी कचरा विरोधात युवक (#Youth V/s Garbage) ही टॅगलाईन जाहीर करण्यात आली आहे. या माध्यमातून प्रत्येक शहराने आपला संघ तयार करणे आणि या संघाचा कर्णधार जाहीर करणे अपेक्षित आहे. त्यानुसार ठाणेकरांचे प्रतिनिधित्व करणारा ‘ठाणे टायगर्स’ हा संघ जाहीर करण्यात आला आहे. वाघ हे पर्यावरणीय समतोलाचे प्रतीक असल्याने त्या वाघाच्या तडफेने आणि सर्वसमावेशकेतेने ठाणेकर स्वच्छतेचे धेय्य गाठतील अशा उद्देशाने संघाच्या बोधचिन्हाची रचना करण्यात आली आहे. आपला सक्रिय सहभाग दर्शविण्यासाठी, प्रत्येक ठाणेकर नागरिकाने केंद्र सरकारने जाहीर केलेल्या पोर्टलवरील लिंकवर (https://innovateindia.mygov.in/swachhyouthrally/) नोंदणी करून या स्वच्छता मोहिमेत सहभागी व्हावे असे आवाहन महापालिकेने केले आहे. महापालिका क्षेत्रातील ७००हून अधिक शाळांचे विद्यार्थी १५ आणि १६ सप्टेंबर रोजी याच विषयावर चित्रकला स्पर्धाही होत असल्याची माहिती महापालिका आयुक्तांनी दिली.’इंडियन स्वच्छता लीग’च्या धर्तीवर ठाणे महापालिकेने प्रभाग समिती स्तरावर ‘ठाणे स्वच्छता लीग’चे आयोजन केले आहे. त्यात नऊ प्रभाग समित्यांचे नऊ संघ सहभागी होतील. या संघांना नौपाडा नायक, मानपाडा मावळे, उथळसर योद्धा, लोकमान्य लिजंड्स, दिवा डेअरडेव्हिल्स, मुंब्रा मस्केटिअर्स, कळवा नाईट्स, वागळे वॉरिअर्स, वर्तक वीर अशी नावे देण्यात आली आहेत. ‘इंडिया वर्सेस गार्बेज’ ही केंद्र सरकारमार्फत या लीगसाठी दिलेली टॅगलाईन आहे. स्वच्छता ही नियमित करण्याची गोष्ट असल्याने स्वच्छता विषयक अधिक चांगले काम करीत राहणे हेच आपले उद्दिष्ट आहे. त्यादृष्टीने ‘इंडियन स्वच्छता लीग’ मध्ये प्रत्येक ठाणेकर नागरिकाने पोर्टलवर रजिस्ट्रेशन करावे. तसेच, शहराचे स्वच्छता मानांकन उंचावण्यासाठी ‘ठाणे टायगर्स’ संघाचा एक सदस्य म्हणून आपले कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन महापालिकेनं केलं आहे.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading