ठाण्यात शेकडो टन गोमांसाची अवैध वाहतूक, आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाची पोलीस आयुक्तांना भेट

गेल्या महिन्याभरात हिंदुत्ववादी संघटनांनी ठाणे शहरात शेकडो टन गोमांस अवैधरित्या वाहतूक होताना पोलिसांच्या मदतीने पकडून दिले. अशा प्रकरणात फक्त वाहन चालकांवर कारवाई होते, पण यामागील मुख्य सूत्रधारांवर कारवाई होत नसल्याने गोवंश हत्या वाढीस लागल्या आहेत. याबाबत आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने पोलीस आयुक्तांना भेट दिली.

मुंबई, नवी मुंबईसह ठाण्यात गोमांसाची अवैध वाहतूक मोठ्या प्रमाणात होत आहे. २३ सप्टेंबर रोजी नौपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सात टन तर दुसऱ्या दिवशी १३०० किलो गोमांस राबोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पकडण्यात आले. पोलिसांच्या मदतीने विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि भारतीय गोवंश रक्षण संवर्धन परिषद या संघटनांच्या कार्यकर्त्यांनी हे गोमांस पकडून दिले. अशा प्रकरणांमध्ये फक्त वाहन चालक आणि सहायक कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्यात येते, मात्र सखोल तपास न झाल्याने या मागील मुख्य सूत्रधार मोकाट राहतात. त्यामुळे कायदा असूनही गोवंश हत्येचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे मत आमदार संजय केळकर यांनी व्यक्त केले आहे. या प्रकरणी आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली हिंदुत्ववादी संघटनांच्या प्रतिनिधींचे शिष्टमंडळ पोलीस आयुक्त जय जित सिंग यांना भेटले. यावेळी त्यांनी अशा कारवाईबाबत एसओपी तयार करण्याची मागणी केली. असा गुन्हा उघडकीस आणताना गोरक्षक कार्यकर्त्यांना पोलिसांकडून चांगली वागणूक आणि सहकार्य मिळावे. पोलीस आयुक्तालय हद्दीत कायद्याच्या अंमलबजावणीसाठी विशेष पथक तयार करण्यात यावे. अशा गुन्ह्यात वाहन चालक आणि सहायक कर्मचाऱ्याबरोबरच गोवंश खरेदी-विक्री करणारे, वाहतूक करणार, कसाई आणि मांस खरेदी-विक्री करणारे यांच्यावरही कारवाई करून गोमांस माफिया टोळीचे समूळ उच्चाटन करावे, आदी मागण्या यावेळी आयुक्तांकडे करण्यात आल्याची माहिती आमदार केळकर यांनी दिली. आयुक्त जय जित सिंग यांनी एसओपीबाबत सकारात्मक भूमिका घेऊन सहकार्य करण्याचे आश्वासन आमदार संजय केळकर यांना दिले. शिष्टमंडळात आमदार संजय केळकर यांच्यासह विश्व हिंदू परिषदेचे प्रांत मंत्री रामचंद्र रामुका, राजेंद्र पाटील, कल्याण विभाग मंत्री ऍड. मनोज रायचा, ठाणे विभाग मंत्री मनोज शर्मा उपस्थित होते.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading