ठाण्यात लवकरच ४ नवीन जलतरण तलाव

ठाण्यामध्ये आणखी चार जलतरण तलाव निर्माण केले जाणार आहेत. शहरामध्ये फक्त कळवा, कोपरी, वर्तकनगर या भागामध्येच ऑलम्पिक साईज जलतरण तलाव आणि त्याच ठिकाणी आधुनिक जिम आहेत. वर्तकनगर येथे प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नांनी एक स्विमिंग पूल तयार झाला आहे. तो परिसरातील आजूबाजूच्या नागरिकांना उपयोगी पडेल. पण शहराच्या इतर भागात नागरिकांना त्यांच्या जवळच आपापल्या भागात सरकारचे स्विमिंग पूल असावेत अशी आमदार सरनाईक यांची संकल्पना आहे. हे स्विमिंग पूल बांधण्यासाठी नगरविकास खात्यामार्फत लवकरात लवकर निधी मंजूर करावा अशी विनंती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन सरनाईक यांनी केली होती. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी हा २० कोटींचा निधी मंजूर केला आहे. घोडबंदर रोड येथे चार स्विमिंग पूल बांधण्यासाठी प्रत्येकी ५ कोटी असे एकूण २० कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे सर्व अर्थाने शहराच्या ४ वेगवेगळ्या भागात होणारे हे स्विमिंग पूल नागरिकांच्या आरोग्याच्या फायद्याचे ठरतील. घोडबंदर रोड, आनंद नगर कासारवडवली आणि वाघबीळ अशा ४ ठिकाणी ऑलम्पिक साईज जल तरण तलाव आणि त्याचठिकाणी जिम बांधण्याची मागणी आमदार सरनाईक यांनी केली होती. तलाव बांधण्यामध्ये७५ टक्के हिस्सा राज्य शासनाचा आणि २५ टक्के हिस्सा महापालिकेचा असेल.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading