ठाण्यातील पर्यावरणवादी कार्यकर्ते मयुरेश भडसावळे यांचं जर्मनीत छायाचित्रांचं प्रदर्शन

ठाण्यातील सामाजिक आणि पर्यावरणवादी कार्यकर्ता आणि सध्या ब्रिटनमधील ग्लासगो विद्यापिठात हवामान बदल या विषयावर पदव्युत्तर शिक्षण घेत असलेले मयुरेश भडसावळे यांनी या विषयावर काढलेल्या छायाचित्रांचे प्रदर्शन जर्मनी च्या डेस्डेन शहरात ग्रीन पार्टीच्या वतीने आयोजित करण्याचा सन्मान प्राप्त झाला आहे. ठाणेकरांसाठी ही अभिमानाची बाब आहे. गेला काही काळ मयुरेश भडसावळे इरॅसमस स्कॅालर म्हणून युरोपमध्ये राहून ‘शहरी हवामान बदलाच्या’ विविध पैलूंचा अभ्यास करत आहे. या अभ्यासाच्या पार्श्वभूमीवर ‘Warming Cities म्हणजेच ‘तापलेली शहरे’ या थीमअंतर्गत त्याने काढलेल्या निवडक छायाचित्रांचे प्रदर्शन जर्मनीमधील डेस्डेन शहरात सध्या सुरू आहे. हे प्रदर्शन ३१ ऑगस्ट पर्यंत चालू राहणार आहे. सध्या इंग्लंड मध्ये असलेल्या ठाण्यातील जेष्ठ पर्यावरण अभ्यासक डॅा. संजय मंगला गोपाळ यांच्याशी बोलताना त्यांनी या संदर्भात अधिक माहिती दिली. जागतिक हवामानबदलाचे शहरांमध्ये, स्थानिक पातळीवर होणारे परिणाम हा विषय जागतिक विचारविश्वामध्ये महत्वाचा आहे. विशेषतः क्लायमेट पॉलिसी आणि क्लायमेट अॅक्शन या दृष्टीकोनांतून ‘हवामानबदल आणि शहरे’ यावर अनेक प्रकारे गंभीर चर्चा आणि संशोधन सुरू आहे. शहरांमधील वाढते तापमान आणि वाढत्या उष्णतेमुळे निर्माण होणारी आव्हाने, समस्या हा त्यापैकी एक महत्वाचा पैलू.या अभ्यासाच्या, प्रदर्शनाच्या निमित्ताने जर्मनीमधील वेगवेगळी शहरं, तिथे हवामानबदलाचे जाणवणारे परिणाम, त्यामुळे रोजच्या जीवनात उभे राहिलेले प्रश्न याबाबत अनेक पत्रकार, संशोधक, स्थानिक लोकप्रतिनिधी, पर्यावरणीय संस्था यांच्याशी सातत्याने संवाद सुरू आहे. हवामानबदलासारख्या बुचकळ्यात पाडणाऱ्या, अंदाज चुकवणाऱ्या आव्हानामुळे स्थानिक स्वराज्य संस्था हैराण आहेत.आंतरराष्ट्रीय राजकारण आणि आता विशेषतः परराष्ट्र धोरणाच्या चष्म्यातून पाहता जागतिक हवामानबदल आणि त्यावरच्या समस्या – उपाय हा विलक्षण जटिल आणि गुंतागुंतीचा मुद्दा आहे. मात्र हवामान बदलाचे स्थानिक दुष्परिणाम रोखण्यासाठी तातडीने काय उपाययोजना करायला हव्यात यामागे युरोपातील ग्रीन पॉलिटिक्सने अत्यंत गांभीर्याने मोठा जनाधार उभा केला आहे. युरोपियन युनियन असेल वा देशोदेशीच्या ग्रीन पार्टीज, हवामानबदल हा विषय स्थानिक पातळीवर सातत्याने चर्चिला जातो आणि त्यात लोकांनी सहभागी व्हावे म्हणून आवर्जून प्रयत्न केले जातात. आपल्याकडेही राजकीय पक्षांमध्ये आणि सामान्य लोकांमधे हवामान बदल आणि त्याचे दुष्परिणाम या बद्दल अशी सजगता आणि सक्रियता वाढावी, या दृष्टीने स्मृतीशेष प्रदीप इंदुलकर, संशोधक मयुरेश भडसावळे, संजय मंगला गोपाळ यांनी जाग, समता विचार प्रसारक संस्था आदी माध्यमातून ठाण्यातील तलाव, बागा आणि अन्य पारंपारिक स्थळांच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी तसंच उर्जा विवेक जागरासाठी आखलेल्या मोहिमा नवीन पिढीपर्यंत पोहोचविण्याकरिता विशेष प्रयत्न आवश्यक असल्याचं मत ठाण्यातील जेष्ठ कार्यकर्ते नितिन देशपांडे, जगदीश खैरालिया आदींनी व्यक्त केले आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading