ठाण्यातील नौपाडा भागात अनोखं ध्वजवंदन

ठाण्यातील नौपाडा भागात एक अनोखं ध्वजवंदन पहायला मिळतं. वय वर्ष सहा ते दहा वयोगटातील मुलं दरवर्षी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी आवर्जून एकत्र येतात. कौतुकाने आदल्या दिवशी घरी आणलेला तिरंगा हातात घेतात. तो तिरंगा त्यांनी ठरविलेल्या ठिकाणी लावतात. त्या तिरंग्याला कडक सॅल्युट करतात. सगळे मिळून जन गण मन हे राष्ट्रगीत खड्या आवाजात म्हणतात. भारत माता की जयची घोषणा देतात. काही वेळ तिथं खेळतात मग घरी जातात. संध्याकाळी बहुतेक सगळे पुन्हा एकत्र येऊन सॅल्यूट ठोकून तो तिरंगा काढतात. मग खेळतात. हे असं सहजपणे करणारी ती सगळी मुलं आता सोळा ते एकोणीस या वयोगटात गेली आहेत. मात्र अजूनही तीच निरागसता, तोच आनंद घेऊन त्यांनी यंदाच्या ७३व्या स्वातंत्र्य दिनाला झेंडा वंदन केले. आता मुलं मोठी झाली आहेत. त्यामुळे तिरंग्याचा आकारही थोडा वाढला आहे. मात्र तोच उत्साह टिकून आहे. आता सगळे कॉलेज कुमार असल्याने गप्पांचे विषय बदललेले आहेत. यावेळी झेंडावंदनानंतर सर्वत्र होत असलेली ३७०ची चर्चा मुलांच्या तोंडी होती. झेंडावंदन करण्याचा हा उपक्रम त्या मुलांनाच सुचला. त्यांनीच ठरवले आणि आईबाबांना सांगितले आम्ही करणार आहोत. अगदी सहजपणे मुलांनी ते जमवले. कुठलाही आग्रह नसताना, कोणीही न सांगता करणे महत्वाचे असते. त्यातील नियमितता टिकवणे अवघड असते. मुलं उत्स्फुर्तपणे करत आहेत. हा सगळा उपक्रम नौपाड्यातील ब्राह्मण सोसायटीतील मुलं करत आहेत. अर्चित, प्रणव, अदित्य, तेजस, सोहम आणि त्यांचे मित्र हा उपक्रम करत आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading