ठाण्यातील गावदेवी मैदानाची परिस्थिती सुधारावी – डॉ. महेश बेडेकर यांची मागणी

ठाण्यातील गावदेवी मैदानाची परिस्थिती सुधारावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ. महेश बेडेकर यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे. डॉ. बेडेकर यांनी पालिका आयुक्तांना एक पत्र पाठवलं असून गावदेवी मैदान हे ऐतिहासिक मैदान असल्याचं म्हटलं आहे. ठाण्यातील मोकळ्या जागा दिवसेंदिवस कमी होत असून गावदेवी मैदानाचा परिसरही या ना त्या कारणानं कमी होत चालला आहे. जलकुंभ, रस्ता रूंदीकरण तसंच इतर अनेक कारणांमुळे गावदेवी मैदान आक्रसत चाललं आहे. या गावदेवी मैदानाकडे लक्ष देण्याची गरज असून ठाणेकर गावदेवी मैदानाच्या सध्याच्या होणा-या उपयोगाकडे असेच पाहू शकत नाहीत. याप्रकरणी ठाण्यातील मोकळ्या जागांसंदर्भात आपण उच्च न्यायालयात एक याचिकाही दाखल केली असून सध्याच्या कोरोना संसर्गामुळे ती प्रलंबित आहे. गावदेवी परिसरातील वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस जटिल होत असून तो योग्यत-हेनं सोडवण्याची गरज आहे. गावदेवी मैदानातील भुयारी वाहनतळाच्या प्रकल्पाची आपण चौकशी करणार असून प्रसिध्द वास्तुविशारद सुलक्षणा महाजन यांनीही यासंदर्भात अनेक आक्षेप घेतले आहेत. या प्रकल्पामुळे पर्यावरणाला मोठा धोका होऊ शकतो असं त्यांचं म्हणणं आहे. यासंदर्भात सुलक्षणा महाजन यांच्यासमवेत चर्चा करण्यासाठी भेट मिळावी अशी मागणीही महेश बेडेकर यांनी या पत्राद्वारे पालिका आयुक्तांकडे केली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading