ठाणे शहराच्या काही भागाचा पाणीपुरवठा येत्या बुधवारी २४ तास बंद

ठाणे शहराच्या काही भागाचा पाणीपुरवठा येत्या बुधवारी २४ तास बंद राहणार आहे. पिसे टेमघर जलशुद्धिकरण केंद्राला जाणाऱ्या अशुद्ध मुख्य जलवाहिनीची दुरुस्ती तसेच १५०० मिमी मल्टी फंक्शन वॉल्व बसविण्यासाठी बुधवार २३ मार्च रोजी सकाळी ९ ते गुरुवार २४ मार्च रोजी सकाळी ९ वाजेपर्यंत २४ तास बंद राहणार आहे. या कालावधीत स्टेम प्राधिकरणामार्फत होणारा पाणी पुरवठा सुरु राहणार असून पाण्याचे झोनिंग करून शहरात पाणी पुरवठा वितरित करण्यात येणार आहे. ठाणे महापालिकेच्या पिसे टेमघर जलशुद्धिकरण केंद्राला जाणाऱ्या अशुद्ध मुख्य जलवाहिनीला कल्याण पडघा रोडच्या बाजुला सावधनाका येथे गळती आढळून आली आहे. या गळतीमुळे मोठया प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत असून कल्याण पडघा रोड वर या ठिकाणी मोठ-मोठे खड्डे पडलेले आहेत त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी गळती थांबविण्याचे काम तातडीने करण्याची आवश्यकता आहे. तसेच अशुद्ध पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पिसे येथील वसाहतीमध्ये १५०० मिमी मल्टी फंक्शन वॉल्व बसविण्यासाठी हा शटडाऊन घेण्यात येणार आहे. या कालावधीत स्टेम प्राधिकरणामार्फत होणारा पाणी पुरवठा सुरु राहणार असून त्या अनुषंगाने पाण्याचे झोनिंग करून ठाणे शहरात पाणी पुरवठा वितरित करण्यात येणार आहे. त्यानुसार बुधवारी सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत घोडबंदर रोड, पातलीपाडा, हिरानंदानी इस्टेट, समता नगर, आकृती, सिद्धेश्वर, जॉन्सन, इंटरनिटी, ब्रम्हांड, विजयनगरी, गायमुख, बाळकुम, कोलशेत, तसेच आझादनगर या भागात पाणी पुरवठा बंद राहणार आहे. तसेच बुधवार रात्री ९ ते गुरुवारी सकाळी ९ वाजेपर्यंत ऋतु पार्क, जेल, साकेत, रुस्तमजी, कळवा व मुंब्र्याच्या काही भागात पाणी पुरवठा बंद राहणार आहे. या शटडाऊनमुळे पाणीपुरवठा पूर्वपदावर येईपर्यत पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading