ठाणे वाहतूक शाखेतर्फे वाहतूक नियम पाळण्याविषयी जनजागृती

ठाणे वाहतूक शाखेतर्फे वाहतूक नियम पाळण्याविषयी जनजागृती करण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक शाखेचे उपआयुक्त बाळासाहेब पाटील यांनी दिली. रस्त्यावरील ७० टक्के अपघात वाहतुक नियम न पाळल्यामुळे होतात.तेव्हा,नियम मोडण्याच्या प्रकाराला आळा घालण्यासाठी ठाणे पोलिसांनी आता अनोखी शक्कल लढविली आहे. शहरातील महत्वाच्या सिग्नल परिसरात स्वयंसेवकांच्या मदतीने हेल्मेट परिधान करणे टाळणाऱ्या आणि सिग्नल मोडणाऱ्या वाहन चालकांना सिग्नल परिसरात उभे करुन वाहतूक नियमांसंबंधी जनजागृती करण्यात येणार आहे. अशा चालकांकडून दंड वसुल न करता त्यांना फलक घेऊन १५ मिनीटे सिग्नल परिसरात जनजागृती करावी लागणार आहे. त्यानंतरच पोलीस त्या वाहन चालकास सोडतील. शुक्रवारपासुन ही मोहिम सुरु आहे. केंद्र सरकारच्या नव्या कायद्यामुळे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांच्या दंडाच्या रकमेत दुप्पट वाढ झाली आहे. ई चलान कार्यपद्धतीमुळे कारवाई होत असली तरीही वाहन चालकांना केव्हाही दंडाची रक्कम भरण्याची तरतूद असल्याने नियमांचे उल्लंघन सुरूच आहे. दर महिन्याला ठाणे शहरात नियम मोडणाऱ्यांचे प्रमाण हे हजारांच्या घरात असते. दुचाकी चालविताना हेल्मेटचा वापर टाळणाऱ्यांचा आणि सिग्नल लाल रंगाचा असतानाही तो ओलांडणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे अशा वाहन चालकांविरोधात कारवाईसाठी नवी शक्कल लढविली आहे. ठाण्यातील महत्त्वाच्या १८ ठिकाणी वाहतूक पोलिस आणि काही स्वयंसेवक उभे राहणार आहेत. दुचाकी चालविताना हेल्मेटचा वापर टाळणाऱ्या आणि सिग्नल मोडणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई म्हणुन त्यांच्याकडून वाहतुक नियमांबाबत जनजागृती करून घेतली जाणार आहे. त्यांच्या हातामध्ये फलकही दिले जाणार आहेत. त्यांच्याकडून दंडाची रक्कम घेतली जाणार नाही. त्यामुळे वाहतूकीचे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांना त्यांचा बहुमुल्य वेळ सिग्नल परिसरात व्यतीत करावा लागणार आहे. तर ज्या वाहन चालकांना जनजागृती करायची नसेल त्यांच्याकडून मात्र दंड वसूलला जाणार आहे.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading