ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील वाहतुकीत प्रायोगिक तत्वावर बदल

ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी या परिसरातील वाहतुकीत बदल करण्यात आले असल्याची माहिती   ठाणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस उप आयुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी दिली आहे.

ठाणे रेल्वे स्टेशन येथून सिडको बस स्टॉपकडून अशोक सिनेमाकडे व अशोक सिनेमाकडून सिडको बस स्टॉपकडे जाणाऱ्या रोडवर सकाळी व सायंकाळी मोठ्या प्रमाणात रिक्षा, कार, मोटारसायकल व पायी चालणारे नागरिक ये-जा करीत असतात. त्यामुळे ठाणे स्टेशन परिसर व मुख्य बाजारपेठ परिसर या ठिकाणी वाहतूक कोंडी होत असते. यामुळे गोखले रोडकडून समर्थ भंडार मार्गे उजव्या लेनमधून अलोक हॉटेलकडे, सिडको बस स्टॉपकडून अशोक सिनेमाकडे, चिंतामणी गल्ली मालतीबाई हॉस्पिटलकडून तलावपाळी, मुख्य बाजारपेठ इलेक्ट्रिक गल्लीत नगरसेवक पवन कदम यांच्या ऑफिसकडून गोल्डन सिनेमा कडे, भंडार आळी गोल्डन सिनेमाकडून खारटन रोडकडे जाणारा रस्ता या रस्त्यांवर अनेक दुचाकी, ऑटो रिक्षा चार चाकी वाहने विरूध्द बाजूने जात असल्याने वाहतूक कोंडी होवून नागरिकांना त्रास होत आहे. त्यामुळे या परिसरात वाहतुकीची कोंडी होऊ नये व परिसरातील वाहतूक सुरळीत व सुनिश्चित राहण्यासाठी खालील प्रमाणे वाहतुकीत बदल करण्यात आले असल्याचे श्री. राठोड यांनी कळविले आहे.            प्रवेश बंद :- (1) गोखले रोड कडून समर्थ भंडार मार्गे गावदेवी रोड उजव्या लेन मार्गे अलोक हॉटेल कडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना समर्थ महार येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे.

पर्यायी मार्ग :- सदरची वाहने ही समर्थ भंडार कडून डावे वळण घेवून गावदेवी बस स्टॉप कडून पंजाब नॅशनल बँक मार्गे इच्छित स्थळी जातील.

प्रवेश बंद :- (2) सिडको बस स्टॉप कडून अशोक सिनेमा कडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना सिडको बस स्टॉप येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे.

पर्यायी मार्ग :- सदरची वाहने दादोजी कोंडदेव स्टेडियम मार्गे इच्छित स्थळी जातील.

प्रवेश बंद :- (3) टॉवर नाका कडून जांभळी नाका मार्गे खारकर आळी कडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना टॉवर नाका येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे.

पर्यायी मार्ग :- सदरची वाहने टॉवर नाका येथून चिंतामणी चौक मार्गे टेंभी नाका कडून कोर्ट नाका सर्कल मार्गे इच्छित स्थळी जातील.

प्रवेश बंद :- (4) चिंतामणी गल्ली मालतीबाई हॉस्पिटल कडून तलावपाळी कडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना मालतीबाई हॉस्पिटल येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे.

पर्यायी मार्ग :- सदरची वाहने दगडी शाळा चरई येथून आम्रपाली हॉटेल परफेक्ट ड्रायव्हिंग स्कूल समोरून इच्छित स्थळी जातील.

प्रवेश बंद :- (5) मुख्य बाजारपेठ इलेक्ट्रिक गल्लीत नगरसेवक पवन कदम यांच्या कार्यालयाकडून गोल्डन सिनेमा कडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना कल्पेश मेडिकल येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे.

पर्यायी मार्ग :- सदरची वाहने खारटन रोडने शिवसेना शाखा येथून माटे चौक मार्गे इच्छित स्थळी जातील.

 प्रवेश बंद :- (6) भंडार आळी गोल्डन सिनेमा कडून खारटन रोड कडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना गोल्डन सिनेमा येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे.

पर्यायी मार्ग :- सदरची वाहने मुख्य बाजारपेठ इलेक्ट्रिक गल्लीत श्री. पवन कदम, नगरसेवक यांचे ऑफिस कडून खारटन रोड मार्गे इच्छित स्थळी जातील.

 ही अधिसुचना प्रसिध्द झाल्या तारखेपासून १५ दिवस प्रायोगिक तत्वावर लागू करण्यात येत आहे. काही हरकत अगर सुचना असल्यास त्या लेखी स्वरुपात पोलीस उप आयुक्त, शहर वाहतुक शाखा कार्यालय, तीन हात नाका, एल. बी. एस. मार्ग  येथे पाठवाव्यात. याबाबत कोणाच्या काही हरकत अथवा आक्षेप प्राप्त न झाल्यास सदरची अधिसूचना पुढील आदेश होईपर्यंत कायम स्वरुपात अंमलात राहील.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading