ठाणे रेल्वे स्थानकात पादचारी पुलावरील होणारी गर्दी टाळण्यासाठी तात्काळ उपाययोजना करा – खासदार राजन विचारे यांची रेल्वे प्रशासनाकडे मागणी

ठाणे रेल्वे स्थानकातील प्रवाशांचा वाढणारा भार ठाणे रेल्वे स्थानक पेलू शकत नसल्याने मंजूर झालेले प्रकल्प तात्काळ सुरू करा. तसेच ठाणे रेल्वे स्थानकात यापूर्वी एकूण सात पादचारी पुलांपैकी दोन पादचारी पुल नव्याने बांधण्याकरिता तोडण्यात आले आहेत. त्यामुळे सद्यस्थितीत ठाणे रेल्वे स्थानकात प्रवाशांना ये-जा करण्यासाठी फक्त पाच पादचारी पूल असून त्यावर प्रवाशांचा भार पडत आहे. यासाठी तात्काळ उपयोजना करण्यासाठी कल्याण दिशेस असलेला पादचारी पुल सॅटिसला जोडण्यात यावा अशी मागणी खासदार राजन विचारे यांनी मुख्य व्यवस्थापक नरेश लालवाणी आणि मुख्य रेल्वे प्रबंधक रजनीश गोयल यांच्याकडे पत्राद्वारे पुन्हा केली आहे. खासदार राजन विचारे यांनी रेल्वे प्रशासनाशी संपर्क करून ठाणे रेल्वे स्थानकातील पादचारी पुलावरील गर्दीचे फोटो पाठविले आहेत. ठाणे रेल्वे स्थानकात ठाणे महापालिकेने मंजूर केलेल्या २४ कोटी निधीतून पादचारी पुलाचे काम रेल्वे मार्फत सुरू आहे. त्यापैकी महापालिकेने ८ कोटी निधी रेल्वे प्रशासनाकडे वर्ग केला आहे. पुढील निधी प्राप्त होण्यासाठी ठाणे महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा सुरु आहे. परंतु निधीअभावी काम थांबवू नका या पुलावरून रेल्वे प्रवासी ये-जा करणार आहेत. त्यामुळे जबाबदारी ढकलू नका. या पुलावर गर्डरचे काम तात्काळ सुरू करा अशी मागणी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे. तसेच दिवसेंदिवस ठाणे रेल्वे स्थानकातील गर्दी वाढत असल्याने पश्चिम रेल्वे मार्गावरील एलफिस्टन रोड स्थानकातील घटनेची पुनरावृत्ती ठाणे रेल्वे स्थानकात होऊ नये याची रेल्वे प्रशासनाने दखल घ्यावी व तात्काळ उपायोजना करावी असे म्हटले आहे. रेल्वे प्रशासनानेही याची दखल घेऊन काम सुरू करू असे आश्वासन खासदार राजन विचारे यांना दिले आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading