ठाणे रेल्वेस्थानक परिसर कायमस्वरुपी फेरीवाला मुक्त राहिल या दृष्टीने कार्यवाही करण्याचे महापालिका आयुक्तांचे आदेश

रेल्वेस्थानक परिसर कायमस्वरुपी मोकळा राहिल यासाठी रेल्वे स्थानकापासून चारही बाजूला 150 मीटरच्या परिसरात फेरीवाला असता कामा नये अशा प्रकारे कारवाई करण्याचे निर्देश देत असतानाच महापालिका आणि वाहतूक पोलीसांच्या माध्यमातून ठोस उपाययोजना करण्याबरोबरच फ्लायओव्हर वरील आवश्यक स्थापत्ये कामे करण्याच्या सूचना महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिल्या. रेल्वे स्थानकातून बाहेर पडल्यानंतर इच्छितस्थळी पोहोचण्यासाठी प्रवाशांना सहज जाता यावे यासाठी हा रेल्वेस्थानक परिसर फेरीवालामुक्त होण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरू आहे. संपूर्ण ठाणे स्टेशन परिसराची पाहणी यावेळी आयुक्तांनी केली. ठाणे स्थानकातून प्रवाशांना सहजपणे बाहेर पडता यावे यासाठी हा परिसर 24 x 7 फेरीवाला मुक्त करण्यासाठी या ठिकाणी सहाय्यक आयुक्त, प्रभाग अधिकारी, कर्मचारी आणि वर्दीतील पोलीस यांची नेमणूक करुन या परिसरात एकही फेरीवाला असणार नाही, स्थानकाच्या आवारात ज्या ठिकाणी बेघर व्यक्ती असतील त्यांना निवारा शेड येथे घेवून जावे, फेरीवाले आणि भिक्षेकरी बसणार नाहीत तसेच गर्दुल्यांचा वावर राहणार नाही या दृष्टीने नियमित कारवाई करण्याबरोबरच सहाय्यक आयुक्तांची नेमणूक रोटेशन पध्दतीने करण्याचे बांगर यांनी सूचित केले. नियमित कारवाई सुरू न राहिल्यास आणि फेरीवाल्याबाबत तक्रारी आल्यास नेमणूक केलेल्या अधिकाऱ्याला जबाबदार धरले जाईल असा इशारा देत असताना नियमित कारवाईनेच या परिसरात बदल घडून येईल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. ठाणे स्थानकाबाहेरील सॅटिसला जोडणारा पादचारी पूल आणि गोखले रोड वरुन स्टेशनकडे जाणाऱ्या पादचारी पुलाची पाहणी केली. या पुलाच्या दोन्ही बाजूस असलेले कठडे अस्वच्छ असल्याचे निदर्शनास येताच या पुलावर साफसफाईसाठी दोन शिफ्टमध्ये कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्याचे आदेश दिले. हा परिसर स्वच्छ राहिल यासाठी थुंकून विद्रुप झालेल्या कठड्यांची पाण्याने स्वच्छता करुन त्यावर रंग लावण्यात यावा, सुका कचरा, ओला कचरासाठी असलेल्या कुंड्यातील कचरा नियमित उचलला जाईल याची दक्षता घेण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या. सॅटिस पुलावर असलेल्या मोकळ्या जागेत आदीवासी बांधवांची ओळख असलेल्या तारपा वाद्याच्या प्रतिकृतीची डागडुजी करावी, तसेच या ठिकाणी असलेल्या फरशांवर सौंदर्यीकरणाच्या दृष्टीने आकर्षक अशी रंगरंगोटी करण्याच्या सूचना आयुक्तांनी उपनगर अभियंत्यांना दिल्या. ठाणे स्थानकाच्या बाहेर एस टी स्टॅण्डला लागून दुचाकी उभ्या असल्याचे निदर्शनास येताच त्यांनी या परिसरातील पार्किंगचा आढावा घेतला. गांवदेवी येथे स्मार्टसिटीअंतर्गत उभारण्यात आलेले भूमिगत वाहनतळ लवकरच सुरू होणार असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच भाजी मंडई येथील वाहनतळ आणि नाईकवाडी येथील खाजगी वाहनतळाच्या हस्तांतरणाची कार्यवाही पुर्ण करुन ताब्यात घेण्याच्या सूचना त्यांनी शहर विकास विभागाला दिल्या.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading