ठाणे महापालिकेची यंदाही ऑनलाईन गणेश विसर्जन टाईमस्लॅाट बुकिंग सुविधा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेश विसर्जनाच्यावेळी गर्दी होवू नये यासाठी महापालिकेच्या डिजीठाणे प्रणालीद्वारे यावर्षीही ऑनलाईन गणेश विसर्जन टाईमस्लॅाट बुकिंग सुविधा राबविण्यात येत असून उद्यापासून सुरु होणाऱ्या बुकिंग सुविधेचा नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन महापौर आणि महापालिका आयुक्तांनी केले आहे. कोविडच्या अनुषंगाने यावर्षीही शहरातील सार्वजनिक आणि घरगुती गणेशोत्सव शांततेत, सलोख्यात आणि सुरक्षित पद्धतीने साजरा करण्यासाठी महापालिका यंत्रणा विविध उपाययोजना करीत आहेत. त्या अनुषंगाने ठाणे महापालिका क्षेत्रात गणेशमूर्ती विसर्जनासाठी डिजीठाणे प्रणाली मार्फत ऑनलाईन टाइमस्लॉट बुकिंग सुविधा यावर्षीही उपलब्ध करून देण्यात येत आहे. गेल्या वर्षी या उपक्रमाला ठाणेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून जवळपास ११ हजार पेक्षा जास्त नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेतला आहे. यावर्षी गणेश विसर्जनासाठी महापालिकेकडून एकूण ४० स्थाने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. त्यामध्ये ७ घाट, १३ कृत्रिम तलाव आणि २० स्वीकृती केंद्र यांचा समावेश आहे. डिजीठाणे प्रणालीद्वारे मूर्ती विसर्जन करण्यासाठी ऑनलाईन टाईमस्लॉट बुकिंग सुविधा १३ कृत्रिम तलाव आणि २० स्वीकृती केंद्रांवर उपलब्ध असणार आहे. www.ganeshvisarjan.covidthane.org या संकेतस्थळावर विसर्जनाचा टाइमस्लॉट बुक करावा. या लिंकवर जाऊन आपल्या प्रभागातील कृत्रीम तलावांची किंवा मुर्ती स्वीकृती केंद्रांची यादी बघून गणेश मूर्ती विसर्जनासाठी आपल्या जवळच्या विसर्जन स्थळाचे टाइमस्लॉट बुक करावे. नागरिकांनी बुकिंग झाल्यानंतर एसएमएसद्वारे आलेली क्यूआर कोड रिसिट डाऊनलोड करून ठेवावी तसेच कोडची प्रिंट अथवा मोबाईलमधील कोड विसर्जन स्थळी असणाऱ्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दाखवून श्रींचे रीतसर विसर्जन करावे. या संबधी काही तांत्रिक अडचण असल्यास ९८१९१७०१७० या क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच सर्व गणेश भक्तांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठाणे महानगरपालिकेने दिलेल्या सुचनांचे पालन करून सहकार्य करण्याचे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading