ठाणे महापालिका हद्दीत रस्ते दुरुस्तीची कामे करणाऱ्या ठेकेदाराविरुध्द कारवाईची नोटीस

निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारांवर कडक कारवाई करण्याचे आदेश नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्यानंतर ठाणे महापालिकेच्या वतीने शहरातील रस्ते दुरुस्तीची कामे करणाऱ्या मे.बिटकॉन इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स प्रा. लि या ठेकेदारांस नोटीस बजावण्यात आली असून रस्ते दुरूस्तूची कामे तात्काळ आणि गुणवत्तापूर्ण न केल्यास गुन्हा दाखल करून कंपनीस काळ्या यादीत टाकण्याचा इशारा देण्यात आला आहे. ही कारवाई महापालिका आयुक्त विपिन शर्मा यांच्या आदेशान्वये करण्यात आली.
एकनाथ शिंदे यांनी रस्त्यांच्या खड्ड्यांची पाहणी केली असता कामे दर्जा राखून योग्य न झाल्याबाबत आणि नागरिकांची गैरसोय झाल्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली होती. यावेळी रस्त्यांचे निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले होते. त्या अनुषंगाने निविदाकारांना तातडीने कामे करण्याबाबत आणि त्यांच्याविरुध्द कारवाई करण्याबाबत बांधकाम विभागाकडून नोटीस बजावण्यात आली आहे. संबंधित ठेकेदारास शक्तिपीठ मानपाडा ते नागलाबंदर मलप्रक्रिया केंद्र आणि युनी ॲपेक्स कंपनी ते शिवमंदीर गायमुख दरम्यानच्या रस्त्याचे काम करण्यासाठी कार्यादेश देण्यात आला आहे. या भागातील डांबरीकरण पुर्ण न झालेल्या भागाचे सुरज वॉटर पार्क ते एमटीएनएल कार्यालय, कॉसमॉस ज्वेल्स ते कासारवडवली सिग्नल, पानखंडा रोड ते नागलाबंदर सिग्नल आणि गायमुख ते भाईदरपाडा गाव, वाघबिळ चौक ते पातलीपाडा चौक या भागात पावसाळ्यात रस्त्यातील खड्डे भरुन आणि तात्पुरती दुरुस्ती करुन रस्ता वाहतुकीयोग्य ठेवणे ही संबंधित ठेकेदाराची जबाबदारी आहे. परंतु कार्यकारी अभियंत्यांनी वेळोवेळी सुचना देवूनही या रस्त्याच्या सुरज वॉटर पार्क ते एमटीएनएल कार्यालय, कॉसमॉस ज्वेल्स ते कासारवडवली सिग्नल, पानखंडा रोड ते नागलाबंदर सिग्नल तसेच गायमुख ते भाईंदरपाडा गाव, वाघबिळ चौक ते पातलीपाडा चौक या भागात काम न केल्याने मोठ्या प्रमाणावर खड्डे दिसून येत आहेत. या खड्ड्यांमुळे या सर्विसरोडचा वापर नागरिकांना करता येत नसून हायवेवर टॅफिक होत असल्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. तसेच या रस्त्यावर केलेले काम काही ठिकाणी काही दिवसातच नादुरुस्त झाले आहे. यामुळे यापूर्वी केलेले काम योग्य दर्जाचे न झाल्याचे निदर्शनास आल्याने ठेकेदाराने केलेल्या आणि नादुरुस्त झालेल्या कामांचे देयक महापालिकेच्या वतीने अदा करण्यात येणार नसल्याचे नोटीसीमध्ये स्पष्ट केले आहे. बांधकाम विभागाने दिलेल्या सुचनेनुसार ठराविक वेळेत, काम पुर्ण केले नसल्याने निविदेतील अटी आणि शर्तीनुसार दंडात्मक कारवाई का करण्यात येवू नये याचा खुलासा ३ दिवसात करण्याचे आदेश संबंधित ठेकेदारास देण्यात आले आहेत. तसेच या कामासोबतच या ३ दिवसाच्या कालावधीत कार्यालयाने दिलेल्या सुचनेनुसार नौपाडा कोपरी प्रभाग समिती, उथळसर प्रभाग समिती आणि वर्तकनगर प्रभाग समितीमधील देखील खड्डे दुरुस्तीचे काम योग्य गुणवत्ता राखुन काम पुर्ण करून रस्ता वाहतुकीस योग्य करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. दरम्यान सर्व कामे तात्काळ न केल्यास नागरिकांना गैरसोय निर्माण केल्याबाबत योग्य तो गुन्हा दाखल करून संस्थेस काळ्या यादीत टाकण्याचा ईशाराही महापालिकेने दिला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading