ठाणे महानगरपालिकेच्या सेवाप्रवेश नियमावलीस राज्यशासनाची मान्यता

ठाणे महानगरपालिकेच्या सेवाप्रवेश नियमावलीस राज्यशासनाने मान्यता दिली आहे.
1982 मध्ये ठाणे महानगरपालिकेची स्थापना झाली. नव्याने विकसित झालेल्या घोडबंदर विभागामुळे नागरिकरणामध्ये झपाट्याने वाढ होत आहे, यानुसार नागरिकांना मुलभूत सेवासुविधांसह मानदंड ठरणारे प्रकल्प राबविणे, केंद्र व राज्यशासनाचे महत्वाचे उपक्रम, संस्था, प्रकल्प यामुळे पायाभूत सुविधा नियमित व गतीमान पध्दतीने उपलब्ध करुन देता याव्यात यासाठी महापालिकेला प्रशासन म्हणून भूमिका पार पाडत असताना महापालिकेच्या आस्थापनेवरील पदे निर्माण करणे आवश्यक होते. तसा प्रस्ताव महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी राज्यशासनास सादर केला होता. त्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने मान्यता मिळाली असून येत्या काळात ठाणेकरांना अधिक गतिमानतेने सेवासुविधा उपलब्ध होणार असून महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच सेवा प्रवेश आणि सेवांचे वर्गीकरणाचा प्रस्ताव मंजूर झाला असल्याचेही आयुक्तांनी नमूद केले. सद्यस्थितीत महापालिकेच्या नऊ प्रभाग समित्या असून एकूण क्षेत्रफळ 147 चौ.कि.मी इतके आहे. ठाणे महापालिकेची लोकसंख्या अंदाजे 27 लाख इतकी आहे. या लोकसंख्येला सेवासुविधा पुरवित असताना निश्चितच महापालिकेच्या आस्थापनेवर अधिकारी कर्मचारी यांची नेमणूक होण्याकरिता सेवाप्रवेश आणि सेवांचे वर्गीकरण अंतर्गत शासनास प्रस्ताव सादर करण्यात आला होता.
ठाणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील पदे ही महापालिकेच्या वेळोवळी झालेल्या सर्वसाधारण सभेच्या अनुषंगाने निश्चित करण्यात येत होती व त्या – त्या पदांसाठी असलेल्या सेवाशर्ती, नियम हे महासभेच्या मान्यतेने करण्यात येत होते. अशा सेवा शर्थींना पदनिहाय त्या- त्या वेळी शासनाकडून मान्यता घेण्यात येवून अशी पदभरती पदोन्नती/ नामनिर्देशनाने करण्यात येत होती. विविध कालावधीत आवश्यकतेनुसार त्या त्या पदांचे सेवाप्रवेश, नियम निर्धारित झालेले असल्याने त्यामध्ये विविधता दिसून येत होती. ठाणे महापालिकेचा सेवा नियम 2023 शासनाने मंजूर केल्यामुळे महापालिकेच्या आस्थापनेवरील विविध पदे भरण्याबरोबरच पदोन्नती आणि आश्वासित प्रगतीचा मार्ग मोकळा होणार आहे. तसेच आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध होणार असल्याने नागरिकांना महापालिकेमार्फत उत्तम दर्जाच्या सेवा कमी वेळेत सुविधा उपलब्ध करुन देणे शक्य होणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले.
तसेच ठाणे महापालिकेच्या आस्थापनेवरील अधिकारी कर्मचा-यांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा झाला असल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये देखील आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading