ठाणे पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाच्या वर्षभराच्या कारवाईत दोन कोटी बहात्तर लाखांचे अमली पदार्थ हस्तगत तर 688 जणांविरुद्ध कारवाई

ठाणे शहर पोलीसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने सन 2022 मध्ये विविध ठिकाणी कारवाई करून सुमारे 2 कोटी 72 लाख रु. किमतीचे अंमली पदार्थ पकडले आहेत. या मोहिमेत एकूण 688 जणांविरुद्ध कारवाई केली असल्याची माहिती शहर पोलीस आयुक्तालयाचे अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांनी दिली. अंमली पदार्थाचे सेवन आणि वापरा संदर्भात परिणामकारक प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यासाठी गठित जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी कार्यकारी समितीची बैठक मोराळे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी पोलीस आयुक्तालयाच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने जानेवारी 2022 ते डिसेंबर 2022 या कालावधीत विविध भागात कारवाई केली. यावेळी गांजा, चरस, कोकेन, मेफेड्रॉन, वेगवेगळ्या कंपन्यांच्या नशेच्या गोळ्या, कफ सिरफ, हेरॉईन, अफिम, केटामाइन आणि मॅथेक्युलिन यासह विविध अंमली पदार्थ जप्त केले. आयुक्तालय हद्दीत अंमली पदार्थांचे सेवन, विक्री आणि हाताळणीला प्रतिबंध घालण्यासाठी पोलीसांसह विविध विभागाने सक्रीय रहावे. खासगी कुरियरमार्फत येणारे पार्सल, पोस्टामार्फत येणाऱ्या वस्तू, बंद पडलेले कारखाने, गोडाऊन, निर्जन जागा अशा ठिकाणी विशेष लक्ष देण्याच्या सूचना मोराळे यांनी यावेळी दिल्या. या बैठकीस अन्न आणि औषध प्रशासनचे औषध निरीक्षक कैलास खापेकर, जिल्हा सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कमलाकर जावळे, राज्य उत्पादन शुल्क ठाण्याचे राजेंद्र शिरसाट, शहर पोलीस दलातील अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांच्यासह समिती सदस्य उपस्थित होते.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading