ठाणे पूर्व सॅटीसचे काम अधिक प्रभावीपणे करण्याचे महापौरांचे आदेश

ठाणे पूर्व येथील सॅटिस आणि नवीन उपनगरीय रेल्वे स्थानकाचे काम हे नियमितपणे सुरू आहे, परंतु हे काम अधिक प्रभावीपणे करण्याच्या सूचना महापौर नरेश म्हस्के यांनी एका बैठकीदरम्यान प्रशासनाला दिल्या. सॅटिसच्या कामामध्ये बाधित होणारी घरे आणि दुकाने यांचे तातडीने पुनर्वसन करावे. तसेच रेल्वे स्थानकालगतच्या डेकच्या कामाचाही शुभांरभ लवकरच पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे यांच्या उपस्थितीत करण्यात येणार असल्याचे महापौरांनी सांगितलं. ठाणे स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेल्या सॅटिस पूर्व आणि नवीन उपनगरीय स्टेशन कामाचा आढावा घेण्यासाठी महापौरांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. ठाणे महापालिकेच्या वतीने कोपरी विभागातील वाहतूक कोंडी सोडविण्याच्या दृष्टीकोनातून महत्वाकांक्षी असा प्रकल्प स्मार्टसिटी अंतर्गत सुरू आहे. या कामामध्ये काही निवासी घरे, दुकाने तसेच झाडांमुळे कामास विलंब होत आहे, यावर निर्णय घेण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रकल्पात बाधित होणाऱ्या नागरिकांचे तातडीने महापालिकेने पुनवर्सन करावे, तसेच बाधित गाळेधारकांना उपलब्ध असलेल्या ठिकाणी गाळे हस्तांतरीत करावे आणि बाधित होणाऱ्या वृक्षांचं पुनर्रोपण करुन हे काम अधिक गतीने करावे अशाही सूचना महापौर नरेश म्हस्के यांनी दिल्या. या प्रकल्पातंर्गत महत्वाचा टप्पा म्हणजे ठाणे पूर्व रेल्वे स्थानकाबाहेरील पार्किंगच्या जागेवर तयार करण्यात येणारा डेक. या डेकच्या बांधकामासाठी रेल्वे प्रशासनानेही परवानगी दिली असून या कामास तातडीने मंजुरी मिळावी यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे आणि श्रीकांत शिंदे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. ठाणे पूर्व येथे सॅटिस प्रकल्पांतर्गत उभारण्यात डेकवर अद्ययावत अशा सेवासुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या सॅटिस प्रकल्पातंर्गत कन्हैयानगर कोपरी येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयालगत असलेल्या जागेत बस आगार तयार करण्यात येणार असून या ठिकाणी इलेक्ट्रीक बसेस चार्जिंग स्टेशन असणार आहे. सॅटिस प्रकल्पाची सुरूवात ही ठाणे पश्चिमेकडील पूर्व द्रुतगती मार्गावरील सेवा रस्त्यालगत असलेल्या तुळजाभवानी मंदिर येथून होणार असून पुढे कोपरी रेल्वे पूल- सिद्धार्थ नगर- ठाणे पूर्व रेल्वेस्थानक फलाट क्र. 10- मंगला हायस्कूल- नाखवा हायस्कूल –कन्हैयानगर असा असून संपूर्ण प्रकल्प 2.24 कि.मी.चा उन्नत मार्ग आहे. तसेच नवीन उपनगरीय रेल्वेस्थानक हे मनोरुग्णालयाच्या जागेत होणार असून त्याचा फायदा ठाणे – मुलुंड या रेल्वे स्थानकावरील प्रवाशांची गर्दी कमी होण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading