ठाणे पूर्वमध्ये आढळला तब्बल तीन फूट लांबीचा डुरक्या घोणस

सध्या उन्हामुळे अंगाची लाही लाही होत असून सर्वसामान्य माणूस उष्म्यामुळे त्रस्त झाला असतानाच सरपटणारे प्राणी देखील गारव्याच्या शोधात नागरी वस्तीत आढळून येत आहेत. ठाण्याचा पारा ३७ अंशावर पोहचला आहे. त्यामुळे कमी तापमानात वावरणारा डुरक्या घोणस या सापाचं आता दर्शन होत आहे. ठाणे पूर्वतील सावरकर नगर येथे राहणा-या पत्रकार प्रशांत सिनकार यांच्या घरासमोरच तब्बल तीन फूट लांबीचा डुरक्या घोणस आढळून आला. घोणस आणि अजगराचा साम्य असणारा हा साप बघून रहिवाशांची भंबेरी उडाली होती. अजगर हा बिनविषारी असला तरी घोणस हा विषारी आहे. भारतामध्ये सापाच्या दंशामुळे दगावणारे रूग्ण हे घोणस या सापामुळे मृत्यूमुखी पडतात. डुरक्या घोणस हा नक्की कोणत्या प्रकारचा साप आहे याचा पटकन उलगडा होत नाही. या पार्श्वभूमीवर रहिवाशांनी सर्पतज्ञ अनिल कुबलना पाचारण केलं होतं. अनिल कुबल यांनी त्वरीत दगडाआड दडून बसलेल्या सापाला पकडून सुरक्षित ठिकाणी सोडलं. हा साप खडकाळ अथवा भुसभुशीत जमिनीत वास्तव्य करून असतो. जानेवारी ते मार्च या सापाचा मिलनाचा काळ आहे. या सापाची लांबी साधारण ४ फूटापर्यंत असते. शरीर एकदम जाडजूड आणि शेपूट आखूड असते. सापाच्या शरीरावर गडद तपकिरी डाग असतात. त्याच्या तोंडावरील आणि शेपटीवरील खवले अतिशय खरखरीत असतात. हा साप निशाचर असल्यामुळे शक्यतो रात्रीच्या वेळी हा साप दिसतो. एकाच वेळी २५ ते ३० पिल्लांना तो जन्म देत असल्याचं अनिल कुबल यांनी सांगितलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading