ठाणे जिल्हा हौसिंग फेडरेशनवर भाजप पुरस्कृत समर्थ पॅनेलचे निर्विवाद वर्चस्व

ठाणे जिल्हा हौसिंग फेडरेशनच्या पंचवार्षिक निवडणुकीत भाजप पुरस्कृत समर्थ सहकार पॅनेलने बाजी मारली. या चुरशीच्या निवडणुकीत भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा हौसिंग फेडरेशनचे विद्यमान अध्यक्ष सीताराम राणे यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने हॅटट्रीक करून नवा इतिहास रचला. सीताराम राणे यांच्या समर्थ सहकार पॅनेलने सर्वच्या सर्व २१ जागा भरघोस मताधिक्याने जिंकत विरोधी महाविकास आघाडीच्या परिवर्तन पॅनेलचा अक्षरशः धुव्वा उडवला. २०२३ या वर्षातील ठाण्यातील पहिलीच निवडणुक जिंकुन भाजपने दणक्यात श्रीगणेशा केल्याने आ.निरंजन डावखरे आणि आ.संजय केळकर यांनी मतमोजणी केंद्रात धाव घेत सीताराम राणे आणि त्यांच्या पॅनेलमधील सर्व विजयी उमेदवारांचे गुलाल उधळुन अभिनंदन केले. ठाणे जिल्हा हौसिंग फेडरेशनच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या २१ जागांसाठी मतदान होऊन लगेचच निकाल जाहीर झाला. भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा हौसिंग फेडरेशनचे विद्यमान अध्यक्ष सीताराम राणे यांच्या समर्थ सहकार पॅनेल आणि महाविकास आघाडी पुरस्कृत सतनाम रसगोत्रा आणि जिल्हा बँकेचे शिवाजी शिंदे यांच्या परिवर्तन पॅनेलमध्ये या निवडणुकीत चुरस रंगली होती. समर्थ पॅनेलचे २१ उमेदवार तर, परिवर्तन पॅनेलचे १९ उमेदवार रिंगणात होते. समर्थ पॅनेलची निशाणी ‘कपबशी’ होती तर परिवर्तनची निशाणी ‘ऑटोरिक्षा’ होती. या निवडणुकीत एकूण १२६० सदस्यांनी मतदानाचा हक्क बजावला. मतमोजणीत यातील हाताच्या बोटावर मोजण्या इतपत मते अवैध ठरली. तरीही तब्बल ७० टक्के अशी घसघशीत मते मिळवुन समर्थ सहकार पॅनेल विजयी झाल्याची घोषणा निवडणुक निर्णय अधिकारी रामचंद्र लोखंडे यांनी केली. या निवडणुकीत हॅटट्रीक करून एकहाती सत्ता राखण्यात यश मिळवल्याने सीताराम राणे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
समर्थ सहकार पॅनेलचे विजयी उमेदवार
सीताराम राणे, ज्ञानु चोरगे, निंबा पाटील, रघुवीर पोतदार, शशिकांत मोरे, डॉ. राजाराम दळवी, विनोद देसाई, अविनाश राऊळ, भरत सुर्वे, विद्या चौधरी, आकांक्षा चौधरी, भगवंत हरणे, विठ्ठल जुवेकर, हिंदुराव गळवे, संतोष तावडे, संतोष साळुंखे, विद्या कदम, शैलजा गस्ते, राजेश सावंत, अशोक तटकरे आणि नंदकुमार वस्त इत्यादी.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading