ठाणे जिल्हा न्यायालयात लोक अभिरक्षक कार्यालय प्रणालीची सुरूवात

आर्थिक कुवत नसलेल्या आरोपी तसेच न्यायालयीन बंदी आणि राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नियमन कायदा 2010अंतर्गत मोफत विधी सेवा मिळण्यास पात्र असणाऱ्या व्यक्तींना त्यांची बचावाची बाजू न्यायालयासमोर मांडण्यासाठी ठाणे जिल्हा न्यायालयात लोक अभिरक्षक कार्यालय या प्रणालीची सुरूवात करण्यात आली आहे. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या इमारतीमध्ये सुरू केलेल्या या लोक अभिरक्षक कार्यालयाचे उद्घाटन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश अभय ओक यांच्या हस्ते आभासी पद्धतीने नुकतेच झाले. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या सुधारीत विधि सेवा बचाव पक्षप्रणालीनुसार हे कार्यालय सुरू करण्यात आले आहे. ज्याप्रमाणे फौजदारी प्रकरणांमध्ये सरकारतर्फे फिर्यादी पक्षाची बाजू न्यायालयासमोर मांडण्यासाठी शासकीय पोलीस अभियोक्ता, लोकअभियोक्ता यांची नेमणूक असून त्या प्रणालीप्रमाणे फौजदारी प्रकरणांचे कामकाज चालते, त्याच धर्तीवर ज्या आरोपीची आर्थिक कुवत नाही किंवा जे न्यायालयीन बंदी आहेत तसेच राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नियमन कायदा 2010अंतर्गत मोफत विधी सेवा मिळण्यास पात्र असणाऱ्या व्यक्तींना त्यांची बचावाची बाजू न्यायालयासमोर मांडण्याकरीता लोक अभिरक्षक कार्यालय प्रणालीची सुरूवात करण्यात आली आहे. या प्रणालीचा उद्देश केवळ मोफत कायदेविषयक सहाय्य देणे नसून मोफत आणि गुणवत्तायुक्त विधी सहाय्य देणे आहे. त्यामुळे या प्रणालीमध्ये विधिज्ञांच्या नियुक्तीकरीता जिल्हा पातळीवर प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश, जिल्हा न्यायाधीश, जिल्हा सरकारी वकील, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव यांची समिती गठित करून त्यांच्यामार्फत विधीज्ञांच्या मुलाखती घेवून गुणवत्तेच्या निकषावर विधिज्ञांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार या कार्यालयात उप मुख्य विधी सेवा बचाव पक्ष वकील म्हणून अॅड. सागर कोल्हे, अॅड. संजय गायकवाड, अॅड संदिप येवले आणि सहाय्यक विधी सेवा बचाव पक्ष वकील म्हणून अॅड. विशाल अहिरे, अॅड. कन्हैया सोनवलकर, अॅड. रूपसिंग बन्सी, अॅड. अभिराजदास, अॅड. अतुल सरोज, अॅड. शिल्पा बाजी. अॅड. मनिष उज्जैनकर यांची नेमणूक करण्यात आली आहे. या कार्यालयाअंतर्गत जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत गुणवत्तायुक्त मोफत सहाय्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. ही मोफत विधी सेवा ही अटक होण्यापूर्वीपासून ते निकाल झाल्यानंतर वरिष्ठ न्यायालयात अपील दाखल करेपर्यंत दिली जाणार आहे, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव ईश्वर सूर्यवंशी यांनी दिली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading