ठाणे जनता सहकारी बँकेच्या ठेवींमध्ये गेल्या वर्षभरात ८२५ कोटींची वाढ तर बँकेला निव्वळ १४१ कोटींचा नफा

ठाणे जनता सहकारी बँकेनं ठेवी आणि कर्ज असा एकूण १६ हजार ३०० कोटी रूपयांचा व्यवसाय केला असून बँकेनं यावर्षी निव्वळ १४१ कोटींचा नफा कमावला आहे अशी माहिती बँकेचे मुख्याधिकारी सुनिल साठे यांनी दिली. बँकेच्या आर्थिक कामगिरीबाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत साठे यांनी ही माहिती दिली. बँकेतर्फे गेली ३ वर्ष १० एप्रिलला बँकेची आर्थिक कामगिरी जाहीर केली जात आहे. ठाणे जनता सहकारी बँकेकडे १० हजार ७०० कोटींच्या ठेवी असून बँकेनं ५ हजार ६६० कोटींचा कर्ज पुरवठा केला आहे. बँकेनं गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा १९५ कोटींचा अधिक कर्ज पुरवठा तर ८२५ कोटींच्या अधिक ठेवी मिळवल्या आहेत. गेल्यावर्षीच्या तुलनेत बँकेला यंदा १५ कोटींचा अधिक नफा झाला आहे. गेल्या वर्षी बँकेला १२६ कोटींचा निव्वळ नफा झाला होता तर यंदा हाच नफा १४१ कोटींवर गेला आहे. बँकेच्या स्वनिधीमध्येही १०७ कोटींनी वाढ झाली आहे. रिझर्व्ह बँकेनं यंदा काही तांत्रिक कारणांमुळे कोणालाच नवीन शाखा सुरू करण्यासाठी परवानग्या दिल्या नव्हत्या. त्यातच इतर अडचणी असतानाही बँकेची कामगिरी उल्लेखनीय असल्याचा दावा सुनिल साठे यांनी केला. सध्याच्या काळात दूरदृष्टी ठेवून विकासाच्या योजना आखण्यापेक्षा आगामी वर्षासाठीच्या विकास योजना आखण्यावर भर असल्यामुळे बँकेची प्रगती होत असल्याचं सुनिल साठे यांनी सांगितलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading