ज्येष्ठागौरींचं घरोघरी विधीवत पूजन

ज्येष्ठागौरींचं काल घरोघरी पारंपरिक पध्दतीनं आगमन झालं. तर आज ज्येष्ठागौरींचं पूजन झालं. ज्येष्ठागौरींचं आगमन हे अनुराधा नक्षत्रावर होतं. काल दिवसभर अनुराधा नक्षत्र असल्यामुळं दिवसभरात कधीही गौरी आणण्याचा मुहुर्त होता. चंद्र अनुराधा नक्षत्रात असताना गौरींचं आगमन होतं. चंद्र ज्येष्ठा नक्षत्रात असताना ज्येष्ठागौरींचं पूजन होतं, तर चंद्र मूळ नक्षत्रात असताना ज्येष्ठागौरींचं विसर्जन केलं जातं असं पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितलं. ज्येष्ठा गौरी, चैत्र गौरी, मंगळागौरी, हरितालिका आणि नवरात्रात पार्वतीची पूजा केली जाते असंही त्यांनी यावेळी सांगितलं. गौरी आगमन म्हणजे सासरी गेलेल्या मुलीला माहेरी येण्याचा हक्काचा दिवस. गौरी आगमनाच्या दिवशी माहेरी आलेल्या मुलीची ओटी भरून पूजा केली जाते. काही ठिकाणी पूर्णाकृती तर काही ठिकाणी खड्याच्या गौरी बसवण्याची पध्दत आहे. ज्येष्ठागौरींचं आगमन, पूजन आणि विसर्जन मुहुर्तावरच केलं जातं. उद्या दिवसभर मूळ नक्षत्र असल्यामुळं दिवसभरात कधीही ज्येष्ठा गौरींचं विसर्जन करता येईल असं दा. कृ. सोमण यांनी सांगितलं. एकदा असुरांच्या त्रासाला कंटाळून सर्व स्त्रिया महालक्ष्मी गौरीकडे गेल्या आणि त्यांनी आपलं सौभाग्य अक्षय्य करण्याविषयी तिची प्रार्थना केली. त्याला अनुसरून गौरीनं असुरांचा संहार केला आणि सर्वांना सुखी केलं. महालक्ष्मीच्या कृपाप्रसादानं आपल्याला सौभाग्य प्राप्त झालं. तेव्हापासून सर्व स्त्रिया महालक्ष्मी गौरीचं पूजन करू लागल्या. गौरीपूजनाच्या दिवशी सासरी गेलेल्या मुली माहेरी येतात तिची आई मुलीचं स्वागत करते. तिची ओटी भरते तिला पंचपक्वान्नांचं भोजन घालते अशी प्रथा आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading