ज्ञानसाधना महाविद्यालयाजवळील सबवे लवकरच खुला होणार – पालिका आयुक्ता कडून पाहणी

पूर्व द्रुतगती महामार्गावरील ज्ञानसाधना महाविद्यालयाजवळील सबवेचे काम पूर्ण होत आले आहे. हा मार्ग लवकरच खुला केला जाणार आहे. सब वे, त्याखालील नाला, तसेच ज्ञानसाधना महाविद्यालया शेजारील रस्ता या कामांची पाहणी महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी केली.

महामार्गाखालून भास्कर कॉलनी मार्गे ठाणे शहरात येण्यासाठी तसेच, कोपरी आणि भास्कर कॉलनीतून ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या दिशेने येण्यासाठी या सबवेचा उपयोग होणार आहे. सबवेचे काम एमएमआरडीए करीत असून त्या खालील नाल्याचे काम ठाणे महापालिका करीत आहे. सब वेला आणि सर्व्हिस रोडला जोडण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्या सोबतच सब वेचे सुशोभीकरण केले जात आहे.

नाल्याचे बांधकाम पूर्ण झाले असून त्यावर भराव टाकून रस्ता केला जाणार आहे. हा रस्ता १५ जूनपर्यंत पूर्ण होण्यासाठी उर्वरित कामाचे नियोजन तशा पद्धतीने करावे. बांधकाम अवधी काही प्रमाणात कमी झाला तरी गुणवत्तेत मात्र तडजोड करू नये, असे आयुक्त श्री. बांगर यांनी सांगितले.

एल बी एस रोड वरील महत्त्वाचा चौक असलेल्या अॅपलॅब चौकाच्या काँक्रीटीकरणाचे कामही प्रगतीपथावर आहे. मध्यवर्ती भागातील काम पूर्ण होत आले असल्याने वाहतुकीस अडथळा येणार नाही. त्याचवेळी, उर्वरित रस्त्याचे काम करतानाही बहुतेक रस्ता वाहतूक योग्य राहील अशी व्यवस्था करावी, अशा सूचना आयुक्त श्री. बांगर यांनी दिल्या.

त्याचवेळी, मॉडेला मिल नाक्यावरील टोल प्लाझा येथे करण्यात आलेल्या नवीन मार्गिका, प्रस्तावित छत यांचीही पाहणी आयुक्तांनी केली.

नितीन कंपनी जंक्शन वरील रस्ते दुरुस्ती बद्दल यापूर्वीच्या पाहणी दौऱ्यात आयुक्तांनी सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे मुख्य वाहतूक मार्गाचे काम झाले आहे. परंतु फूटपाथ, तसेच साईड पट्टी आणि काही पॅचेस शिल्लक आहेत. ते काम पूर्ण करावे तसेच, रस्ते दुभाजकांची दुरुस्ती करून घ्यावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

इंदिरा नगर येथील मुख्य रस्त्यांवरील फुटपाथची पाहणी आयुक्त श्री. बांगर यांनी केली. हे फूटपाथ व्यवस्थित करून त्याची रंगरंगोटी पावसाळ्यापूर्वी करण्यास त्यांनी सांगितले. *काम सुरू असलेले रस्ते वाहतूक योग्य करावेत...*

शहरात २८२ रस्त्यांशिवाय, विकास आराखड्यातील रस्त्यांचीही कामे सुरू आहेत. ही कामे करताना भूसंपादन, अतिक्रमणे यांच्या काही अडचणी आहेत. त्याही पावसाळ्यापूर्वी दूर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यातून मार्ग निघण्यास विलंब होत असेल तर तो रस्ता पावसाळ्यापूर्वी वाहतूक योग्य करून ठेवावा, अशा सूचना आयुक्तांनी बांधकाम विभागाला दिल्या. *अर्धवट खोदकाम आणि मातीचे ढिगारे नकोत*

तसेच, मलनिस्सारण वाहिन्या आणि जल वाहिन्यांची जी कामे सुरू आहेत ते भाग ही पावसाळ्यापूर्वी वाहतूक योग्य करावेत. रस्ते मध्येच खणलेले, मातीचे ढिगारे पडलेले असे चित्र शहरात दिसायला नको, याची खबरदारी घ्यावी असेही आयुक्त श्री. बांगर यांनी स्पष्ट केले. रस्त्यांची कामे सुरू असलेल्या ठिकाणी दिशादर्शक फलक, योग्य बॅरिकेडिंग, पर्यायी रस्ता दर्शवणारा फलक, ट्रफिक वॉर्डनची उपस्थिती यात कोणतीही तडजोड करू नये, असे आयुक्तांनी सांगितले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading