जिवंतपणीच मृत्यूचे खोटे दाखले करून विमा कंपन्यांची लाखो रूपयांची फसवणूक – ६ अटक

जिवंतपणीच मृत्यूचे खोटे दाखले तयार करून विमा कंपन्यांची लाखो रूपयांची फसवणूक करण्याप्रकरणी कल्याण गुन्हे अन्वेषण शाखेनं ६ जणांना अटक केली असून यामध्ये दोघा डॉक्टरांचाही समावेश आहे. एका पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाकडे अशी तक्रार आली होती. त्या अनुषंगाने तपास करताना पोलीसांनी चंद्रशेखर शिंदेला अटक केली. त्याच्या चौकशीत मिळालेल्या माहितीवरून ठाणे महापालिकेच्या मुंब्रा विभागातील स्मशानभूमीत काम करणा-या तेजपाल मेहरोलला अटक करण्यात आली. मेहरोलनं मुंब्र्यातील डॉ. अब्दुल सिद्दीकी आणि ईमान सिद्दीकी यांच्याकडून जिवंत असलेल्या १० व्यक्तींचे आंध्रप्रदेशमध्ये मृत झालेल्या ३ व्यक्तींचे खोटे मृत्यू अहवाल तयार केले आणि महापालिकेकडून त्यांच्या मृत्यूचं खोटं प्रमाणपत्रही काढले आणि ते चंद्रशेखर शिंदेला दिले. या खोट्या मृत्यूपत्राच्या प्रमाणपत्रांवर चंद्रशेखर शिंदे आणि त्याचा मुलगा नारायण शिंदे, सून लक्ष्मी शिंदे यांनी बिर्ला सनलाईफ इन्शुरन्स कंपनीची फसवणूक केली आणि विमा दाव्यातील ८१ लाख रूपयांची रक्कम मिळवली. अजून ५५ लाख रूपये मिळवण्याचा प्रयत्न सुरू असतानाच या सहा जणांना अटक करण्यात आली. विमा कंपन्यांना फसवणारे हे मोठे रॅकेट असावे आणि यामध्ये विमा कंपन्यांचे कर्मचारीही असण्याची शक्यता पोलीस उपायुक्त दीपक देवराज यांनी व्यक्त केली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading