जिल्ह्यामध्ये प्रतिबंधात्मक आदेशाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याची केंद्रीय पथकाची सूचना

जिल्ह्यामध्ये प्रतिबंधात्मक आदेशाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात यावी अशा सुचना केंद्रीय पथकाचे प्रमुख अतिरिक्त सचिव मनोज जोशी यांनी केल्या.कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी प्रतिबंधित क्षेत्रामध्ये लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्याबरोबरच तातडीने सर्वेक्षण आणि वैद्यकीय तपासणी तसेच संस्थात्मक क्वारंटाईन करण्यावर भर देण्यात यावा.
वाढत जाणाऱ्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आढावा घेण्यासाठी केन्द्रीय स्तरावरील पथक ठाणे जिल्ह्यात आले आहे. या केंद्रीय पथकाने कौशल्य हॅस्पीटल, जिल्हा सामान्य रूग्णालय, होरायझन हॅस्पीटल या कोव्हीड हॅास्पीटल्सना तसेच पारसिक नगर कळवा, अमृतनगर, मुंब्रा या ठिकाणी भेट घेवून परिस्थितीचा आढावा घेतला. सर्व विभाग समन्‍वयाने काम करीत आहेत, ही समाधानाची बाब असली तरी जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी जास्तीत जास्त संशयितांची तपासणी करण्यात यावी. प्रत्येक क्षेत्रातील फिवर क्लिनिकच्या ठिकाणी योग्य ती दक्षता घेण्यात यावी. तसेच संस्थात्मक क्वारंटाईन वाढविण्याबरोबरच अधिक चाचण्या करण्यावर भर देण्यात यावा. विशेषत: झोपडपट्टीच्या अथवा जास्त घरांची गर्दी असलेल्या भागांवर विशेष लक्ष केंद्रित करावे. सार्वजनिक स्वच्छतागृह आहे तेथे अधिक काळजी घेण्यात यावी अशा सुचना त्यांनी यावेळी केल्या. तसेच कोव्हीड आणि नॉन कोविड रुग्णालयांमध्ये रुग्ण तपासणी करण्यात यावी. कोविड व्यतिरिक्त ईतर रुग्णांना देखील उपचार मिळावेत यासाठी आवश्यक ते नियोजन करावे अशा सुचना जोशी यांनी यावेळी केल्या.
तसंच पालिकेनं ज्येष्ठ नागरिकांची विशेष काळजी घ्यावी. सर्व ठिकाणी अन्‍नधान्‍याचे वितरण व्‍यवस्थित करावे आणि नागरिकांमध्‍ये असलेली भिती घालवुन विश्‍वास निर्माण करावा असंही जोशी यांनी सांगितले.
ठाणे जिल्ह्यात आरोग्य, पोलिस, महसुल प्रशासन हे संयुक्तपणे काम करीत आहे.सर्व महानगरपालिका तसेच हॉस्पिटलमध्ये पुरेश्या प्रमाणात सर्व सुविधा उपलब्ध आहेत. त्यांना आवश्यकतेनुसार सुविधांची उपलब्धता करुन देण्यात येत असल्याचे कोकण विभागीय आयुक्त शिवाजीराव दौंड यांनी सांगितले.
जिल्ह्यात सुरु असलेल्या कम्युनिटी किचनची आणि अडकून पडलेल्या मजूर- कामगारांची निवास – भोजनाची व्यवस्था प्रशासन आणि विविध संस्थांच्या माध्यमातून करण्यात येत आहे, स्वस्त धान्य दुकानांमार्फत सर्वांपर्यत रेशन पोहोचविण्यात येत आहे. जिल्ह्यात साथरोग प्रतिबंधक कायद्याची प्रभावी अंमलबजावणी सुरु असल्याचं जिल्हाधिका-यांनी सांगितले.
या बैठकीला जिल्ह्यातील सर्व महापालिकांचे वैद्यकीय आधिकारी, तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading