जिल्ह्यातील सर्व म्हणजे बारावीपर्यंतच्या शाळांना गुरुवारी सुट्टी जाहीर

जिल्ह्यात कालपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील सर्व यंत्रणा सतर्क राहून मदत व बचाव कार्य करत आहे. आजही दिवसभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे झालेल्या स्थितीचा जिल्हाधिकारी शिनगारे व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल यांनी आढावा घेतला व जिल्ह्यातील महसूल, जिल्हापरिषद व आरोग्य यंत्रणेने सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या. तसेच उद्या, दि. 20 जुलै रोजी ठाणे जिल्ह्यात अतिवृष्टीचा (ऑरेंज अर्लट) दिलेला इशारा व भरतीची वेळ याचा विचार करून गुरुवारी जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर केल्याचे जिल्हाधिकारी शिनगारे यांनी जाहीर केले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री शंभूराज देसाई, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अपर मुख्य सचिव यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे जिल्ह्यातील परिस्थितीची माहिती घेतली. तत्पूर्वी जिल्हाधिकारी शिनगारे व जिंदल यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, पाणी पुरवठा विभाग, नगरपालिका व महानगरपालिकांचे अधिकारी तसेच इतर सर्व संबंधित यंत्रणांच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला व सूचना दिल्या.
जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये पडलेला पाऊस, पावसामुळे बंद पडलेले रस्ते, पूल, नागरिकांचे स्थलांतर व त्यांची राहण्याची पर्यायी सोय आदींची माहिती त्यांनी प्रशासनाकडून घेतली.
कालपासून ठाणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळी वाढल्यामुळे नदी किनाऱ्यावरील गावातील बाधित कुटुबांचे तातडीने स्थलांतर करून त्यांची राहणे, जेवण आदींची पर्यायी व्यवस्था करावी, अशा सूचनाही जिल्हाधिकारी महोदयांनी दिल्या आहेत.
अंबरनाथ, बदलापूर रेल्वे मार्गावर पाणी साचल्यामुळे लोकल वाहतूक बाधित झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी प्रवास करताना काळजी घ्यावी. तसेच नदी, नाल्यावरील पुलावरून पाणी वाहत असताना कोणतेही वाहन त्यावरून नेऊ नये अथवा त्यावरून रस्ता ओलांडू नये. तसेच आकस्मिक संकट अथवा अडचण आल्यास स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधण्याच्या सूचना शिनगारे यांनी दिल्या आहेत.
यावेळी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेचाही जिल्हाधिकारी महोदयांनी आढावा घेतला. पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथरोगाचा मुकाबला करण्यासाठी आरोग्य यंत्रणेने सतर्क रहाण्याच्या सूचना केल्या. जिल्ह्यातील आरोग्य केंद्रे सुरू ठेवण्यात यावीत व गरजूना तातडीने उपचार करण्यात यावे. आवश्यक ती औषधांचा साठा तयार ठेवावेत. तसेच वैद्यकीय अधिकारी उपलब्ध असतील याची काळजी घेण्याच्या सूचना जिल्हा आरोग्य अधिकारी त्यांच्या यंत्रणांना दिल्या.
पाणी पुरवठा विभागाने नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा होईल याची काळजी घ्यावी. महापालिका क्षेत्रात जेथे पाणी थांबून राहते त्या ठिकाणी पंप बसवून पाण्याचा तातडीने निचरा होईल, हे पहावे. तसेच ज्या घरांमध्ये पाणी जाण्याची शक्यता आहे, तेथील नागरिकांना तातडीने स्थानिक प्रशासनाच्या सहकार्याने पर्यायी जागेवर हलविण्याच्या सूचनाही श्री. शिनगारे यांनी यावेळी दिल्या.
जिल्ह्यातील सर्व शाळांना उद्या सुट्टी
हवामान खात्याने ठाणे जिल्ह्यात उद्याही अतिदक्षतेचा इशारा दिला आहे. तसेच भरतीची वेळ विचारात घेऊन जिल्ह्यातील सर्व महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद व खासगी शाळांना सुट्टी जाहीर केल्याचे शिनगारे यांनी यावेळी सांगितले. अशा परिस्थितीतही शाळा भरविल्यास काही घटना घडल्यास त्यास ते शाळा व्यवस्थापन जबाबदार असतील असेही. शिनगारे यांनी यावेळी सांगितले. यावेळी जिल्ह्यातील शाळा, अंगणवाडी यांचाही आढावा घेण्यात आला. ज्या शाळांची इमारत मोडकळीस आलेली असेल तेथील वर्ग तातडीने थांबवून सुस्थितीतील इमारतीत हलविण्यात यावेत, अशा सूचनाही शिनगारे व जिंदल यांनी यावेळी दिल्या.

नागरिकांनी आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडण्याचे आवाहन
पावसाचा जोर ओसरेपर्यंत नागरिकांनी आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे. तसेच घराबाहेर पडणे आवश्यक असल्यास योग्य ती काळजी घ्यावी. नद्यांच्या पुलावरून पाणी वाहत असताना वाहने पुलावरून नेऊ नये. तसेच कोणत्याही पर्यटनस्थळावर जाऊ नये. नागरिकांना काही मदत लागल्यास स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी शिनगारे व मुख्य कार्यकारी अधिकारी जिंदल यांनी केले आहे.
००००

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading