जिल्ह्यातील ग्रामीण भागातील ६०० मुलामुलींच्या ॲथलेटिक्स स्पर्धेचं आयोजन

जिल्ह्यातील ग्रामीण भागातील ६०० मुलामुलींच्या ॲथलेटिक्स स्पर्धेचं आयोजन ठाण्यातील श्रीमाँ विद्यालयात करण्यात आलं होतं. या स्पर्धेत जिल्ह्यातील शहापूर, बदलापूर, ठाणे या तालुक्यातील कोठारे, तानसा, मोडकसागर या विभागातील ९ मराठी खाजगी आणि जिल्हा परिषद तसंच एका इंग्रजी शाळेतील सुमारे ६०० मुलं-मुली सहभागी झाली होती. ५० मीटर, १०० मीटर, २०० मीटर, ६०० मीटर धावणे, रिले, लांब उडी अशा विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं. जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं. आंतरराष्ट्रीय ॲथलिट गणेश सातपुते, उपजिल्हाधिकारी रेवती गायकर, संजय जाधव असे विविध मान्यवर यावेळी उपस्थित होते. ८, १०, १२ आणि १४ वर्ष वयोगटातील मुलामुलींच्या झालेल्या स्पर्धेत प्रथम विजेत्यांना सायकल, द्वितीय विजेत्यांना फूटबॉल तर तृतीय विजेत्यांना स्किपिंग रोप पारितोषिक म्हणून देण्यात आलं. आंतरराष्ट्रीय ॲथलिट अजित कुलकर्णी यांनी एम्स स्पोर्टस् ॲण्ड फिटनेस संस्थेच्या माध्यमातून जिल्हा परिषद आणि खाजगी शाळातील मुलामुलींसाठी छोट्या छोट्या स्पर्धा घेण्यास सुरूवात केली. अनवाणी धावणा-या या मुलामुलींना शूज, सॉक्स, टी-शर्ट, कॅप बॅग, ट्रॅक सूट असे क्रीडा साहित्य विनामूल्य उपलब्ध करून दिलं. गतवर्षी मुलींची पहिली ॲथलेटिक्स स्पर्धा तानसा येथे झाली होती. या स्पर्धेतील ८ विजेत्या खेळाडूंसाठी खास प्रशिक्षण शिबीराचं आयोजन करणार असल्याची माहिती अजित कुलकर्णी यांनी यावेळी दिली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading