जिल्ह्याचा विकास आराखडा तयार करण्यासाठी सर्व विभागांनी आपापल्या क्षेत्राची बलस्थाने, कमतरता, संधी यांचे विश्लेषण करून माहिती पाठवावी

देशाची तसेच राज्याची अर्थव्यवस्था ट्रिलियन डॉलर होण्यासाठी जिल्ह्यांचे योगदान त्यामध्ये महत्त्वाचे आहे. त्यामुळे जिल्ह्याचा विकास आराखडा तयार करण्यासाठी सर्व विभागांनी आपापल्या क्षेत्राची बलस्थाने, कमतरता, संधी यांचे विश्लेषण करून माहिती पाठवावी. जेणेकरून जिल्हा विकास आराखड्यात त्यांचा समावेश करून एक परिपूर्ण आराखडा शासनाला सादर करता येईल,असे निर्देश जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी दिले.
जिल्हा विकास आराखड्यासंदर्भातील कार्यकारी समितीची बैठक जिल्हाधिकारी शिनगारे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. जिल्ह्याची अर्थव्यवस्था सन 2027-28 पर्यंत दुप्पट करण्यासाठी जिल्हा विकास आराखड्यातील बाबी महत्त्वाच्या ठरणार आहेत. त्यासाठी जिल्ह्यात कोणत्या क्षेत्राच्या वाढीसाठी संभाव्य संधी उपलब्ध आहेत, हे ओळखणे आवश्यक आहेत. जिल्हा विकास आराखड्यात समाविष्ट करावयाच्या बाबीसाठी सर्व प्रथम सर्व विभागांनी आपल्या विभाग/क्षेत्रनिहाय तथ्य आणि सांख्यिकी माहिती गोळा करावी. त्यानंतर त्या क्षेत्राची बलस्थान, कमतरता, त्या क्षेत्रातील संधी आणि धोके यांचे विश्लेषण करून अहवाल सादर करावा. जेणेकरून जिल्ह्याची अर्थव्यवस्था वाढीसाठी जिल्हा विकास आराखड्यात सूचना करता येतील. तसेच जिल्ह्यातील अर्थव्यवस्था वाढीसाठी कोणकोणते क्षेत्र उपयोगी ठरतील यावर तसेच आतापर्यंत दुर्लक्षित असलेल्या क्षेत्रावरही लक्ष केंद्रित करावे. लॉजिस्टिक आणि पायाभूत सुविधांवर यामध्ये भर देण्यात यावा, अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी शिनगारे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जिंदल यांनी दिल्या.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading