जागतिक कोव्हीड स्थितीच्या पार्श्वभूमीवर आयुक्त अभिजीत बांगर यांनी घेतली तातडीची बैठक

चीनसह जपान, फ्रान्स देशात कोरोनाचा उद्रेक होत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्याची आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाची आज तातडीने बैठक घेत शहरात दैनंदिन कोव्हीड चाचण्या आणि लसीकरणाचा आढावा घेतला.
चीनमध्ये ओमायक्रॉनच्या बीएफ- 7 या नव्या व्हेरीएंटचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळले असून भारतातही गुजरात आणि ओरिसा राज्यातही चार रुग्ण आढळून आले आहेत. कोविडच्या मागील लाटेबाबतचा आढावा घेवून यापुढील काळात आरोग्य विभागाने अधिक सतर्क राहण्याची गरज असून कोव्हीडचा धोका अजून टळलेला नाही असा संदेश नागरिकांमध्ये पोहोचविण्याची गरज असल्याचेही आयुक्त अभिजीत बांगर यांनी नमूद केले. ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात आरटीपीसीआर आणि अँटीजेन चाचण्यांची संख्या कमी असून दिवसाला 2000 पर्यत चाचण्या करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. कोविड चाचण्यांच्या माध्यमातून कोविडचा किती प्रसार झालेला आहे ते वस्तुनिष्ठपणे कळू शकते, त्या माध्यमातून कोविडचा प्रसार वाढत आहे किंवा कसे हे योग्यवेळी कळेल या दृष्टीने ही बाब महत्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले. छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, पार्किंग प्लाझा, नागरी आरोग्य केंद्र, रे्लवेस्टेशन्स या ठिकाणीही कोव्हीड चाचण्या सुरू करण्याची कार्यवाही करण्याबाबत सूचना संबंधितांना दिल्या. सॅम्पल घेतल्यापासून 24 तासाच्या आत रिपोर्ट येणे अत्यंत आवश्यक आहे, यामध्ये कोणताही विलंब चालणार नाही यासाठी तीन पाळ्यांमध्ये 24 तास लॅब सुरू राहील या दृष्टीने नियोजन करावे. कोव्हिड लसीकरणावर भर देत असतानाच रुग्णालयातील औषधांची उपलब्धतता, ऑक्सिजनच्या पुरेशा टाक्या, बेड आदींची तयारी ठेवावी.
कोव्हीडच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने सुरू केलेल्या कोविड सेंटरमधील मुलभूत सेवासुविधांची पाहणी करण्यात यावी. यामध्ये ऑक्सिजन, फायर, स्ट्रक्चरल, विद्युतीकरण व पाणीपुरवठा आदी सेवासुविधांचे ऑडिट करुन आवश्यकता असल्यास त्याचे काम करण्यात यावे. जेणेकरुन आगामी काळात कोणतीही समस्या निर्माण होणार नाही या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या. जागतिक स्तरावरील कोव्हीडची जागतिक स्थिती पाहता आपण अत्यंत सतर्क राहण्याची गरज असून कोव्ह‍ीडचा धोका अद्याप टळलेला नाही हे लक्षात घेवून गर्दीच्या ठिकाणी कोव्हीड प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करावे असे आवाहन आयुक्‌त अभिजीत बांगर यांनी नागरिकांना केले आहे.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading