छायाचित्रासह मतदार यादीच्या विशेष पुनरिक्षण कार्यक्रमात जास्तीत जास्त नागरिकांनी मतदार यादीत नाव नोंदविण्याचे आवाहन

निवडणूक आयोगाव्दारे १ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. सर्व घटकातील पात्र मतदारांची जास्तीत जास्त मतदार नोंदणी होण्यासाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी आपले नाव मतदार यादीत समाविष्ट करावे असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे आणि उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम यांनी केले आहे. जिल्ह्यात ३ लोकसभा मतदारसंघ आणि १८ विधानसभा मतदार संघ असून ५ जानेवारी रोजी प्रसिध्द झालेल्या अंतिम मतदार यादीनुसार जिल्ह्यात ६२ लाख १४ हजार ५१७ इतके एकूण मतदार असून यामध्ये ३३ लाख ६७ हजार १२० पुरुष मतदार आणि २८ लाख ४६ हजार ३१९ महिला मतदार आणि १ हजार ७८ तृतीयपंथीय मतदार आहेत. ठाणे जिल्ह्यात एकूण ६ हजार ३९१ मतदान केंद्रे असून ५ हजार ४०२ मतदान केंद्रस्तरीय अधिकारी कार्यरत आहेत.
२१ जुलै ते २१ ऑगस्ट या एक महिन्याच्या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी त्यांच्या यादी भागातील मतदारांच्या तपशीलाची घरोघरी भेटी देऊन संबंधित कुटुंब प्रमुखांकडून पडताळणी करणार आहेत. तसेच या व्यतिरिक्त नोंदणी न केलेले पात्र मतदार, संभाव्य मतदार, एकापेक्षा अधिक नोंदी/मयत मतदार/कायमस्वरुपी मयत मतदार, मतदार यादीतील नोंदीत दुरुस्ती तपासणी करणार आहे.
समाजातील कोणत्याही घटकातील पात्र व्यक्ती मतदानाच्या हक्कापासून वंचित राहू नये यासाठी विविध घटकातील पात्र व्यक्तींना मतदार यादीमध्ये सामावून घेण्यासाठी तृतीयपंथी/देह विक्री व्यवसाय करणाऱ्या महिला/दिव्यांग/कातकरी/बेघर/भटक्या आणि विमुक्त जमाती इत्यादी वंचित घटकांतील पात्र व्यक्तीची मतदार नोंदणी वाढविण्यासाठी विविध शिबीरांचे आयोजन करुन त्यांचे नाव मतदार यादीत समाविष्ट करता येणार आहे. शाळा / महाविद्यालयातील संभाव्य मतदारांची मतदार नोंदणी होणार असल्याने १७ वर्षावरील युवक/युवतींची जास्तीत जास्त मतदार नोंदणी होण्यासाठी शिबिरे आयोजित करण्यात येणार आहे. तसेच मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी, नाव आहे की नाही तपासण्यासाठी, चुकांच्या दुरूस्तीसाठी निवडणूक आयोगाच्या voters.eci.gov.in या संकेतस्थळाचा वापर करता येणार आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading