‘चला जाणूया नदीला’ या अभियानाचा जिल्हाधिका-यांनी घेतला आढावा

जिल्ह्यातील नद्या प्रदुषणमुक्त व त्यांना मूळ प्रवाहात आणण्यासाठी सर्वांनी एकत्रित काम करु या. नद्या पूर्ववत करण्यासाठी एकत्र काम करायचे आहे. चला जाणूया नदीला अभियानाद्वारे स्वच्छ नदीसाठी होत असलेले काम योग्य दिशेन सुरू असून त्यांचा वेग वाढवावा, असे निर्देश जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी आज दिले.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत चला जाणूया नदीला हे अभियान जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या अभियानाची आढावा बैठक नियोजन भवन येथे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
जिल्ह्यातील भातसा, उल्हास, वालधुनी, कुंभेरी, कामवारी, भारंगी, कनकवीरा, चोर नदी, कुशीवली, लेणाड या नद्यांचा सद्यस्थितीचा आढावा घेऊन जिल्ह्यातील या नद्या प्रदुषण विरहित करण्यासाठी तसेच वाहत्या करण्यासाठी कोणत्या उपाय योजना करता येतील यासंदर्भात यावेळी चर्चा करण्यात आली.
नद्या प्रदुषण मुक्त व प्रवाही करण्याचे हे काम आपल्या भावीपिढीसाठी करत आहोत. हे अभियान व्यापक स्वरुपात राबविण्यासाठी नागरिकांचाही सहभाग घ्यावा. यासाठी नदी संवाद अभियानाचे आयोजन करावे. तसेच जनसामान्यांना नदी साक्षर करण्याबाबत उपाययोजना आखाव्यात. नदीचे स्वास्थ आणि मानवी आरोग्य याबाबत प्रचार व प्रसार करावा.
नद्यांच्या किनाऱ्यावरील उद्योगांकडून होणारे दुषित सांडपाण्याचे व्यवस्थापन करणे व दुषित पाण्याचे स्त्रोत बंद करण्यासाठी कडक उपाय योजावेत. नद्या पुनरुज्जीवन करण्यासाठी काम करणारे जलप्रहरी सदस्य व सेवाभावी संस्था यांना सहकार्य करावे. प्रशासनही नद्यांच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी करणार असल्याचेही जिल्हाधिकारी  शिनगारे यांनी यावेळी सांगितले.
नदी सुरक्षा समिती स्थापन करून जानेवारीपर्यंत आराखडा तयार करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
अभियानाच्या समन्वयक जलप्रहरी स्नेहल दोंदे यांनी जिल्ह्यातील नद्यांच्या संदर्भातील सद्यःस्थितीची माहिती दिली. त्या म्हणाल्या की, सर्व मुंबई विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी, स्वयंसेवक, विस्तार शिक्षण विभागाचे विद्यार्थी, आयआयटी मुंबई समन्वयाने उन्नत भारत अभियान अंतर्गत घेतलेली गावे या सर्वांना सर्वेक्षणाचे प्रशिक्षण दिले आहे. नद्यांचे ऐतिहासिक महत्त्व, सामाजिक महत्त्व यांचे मॅपिंग करण्यात येणार आहे. तसेच जैवविविधता व्यवस्थापन समिती आणखी सक्षम करण्यात येणार आहे. वालधुनी नदीचे कॉक्रिटीकरण, कामवारी नदीतील कपड्यांचे प्रदुषण यासह इतर नद्यांतील समस्यांवर चिंतन करून प्रदुषण नियंत्रण मंडळाला आणखी काम करावे लागणार आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading