शनिवारी ठाण्यात रंगणार कोळी महोत्सव

चेंदणी कोळीवाडा सांस्कृतिक कला मंच आयोजित कोळी महोत्सव यंदा शनिवार, २४ डिसेंबर रोजी रंगणार आहे. चेंदणी बंदर जेटी येथे होणाऱ्या या महोत्सवाचे यावर्षी १७ वे वर्ष आहे. या महोत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या जोडीने कोळी पद्धतीचे खाद्यपदार्थ, कोळी समाज लोकजीवन,व्यवसाय यांची माहिती देणारे स्टॉल्स असणार आहेत. प्रारंभी संध्याकाळी ५ वाजता चेंदणी कोळीवाड्यातील विठ्ठल मंदिरापासून शोभायात्रा काढण्यात येईल. ही शोभायात्रा चेंदणी बंदरावर आल्यानंतर समाजातील जेष्ठ नागरिक ऍड रमण देवजी कोळी आणि त्यांच्या धर्मपत्नी, भगवान माणिक कोळी आणि त्यांच्या धर्मपत्नी यांच्यहस्ते महोत्सवाचे उद्घाटन करण्यात येईल. या महोत्सवाचे औचित्य समाजात भरीव कामगिरी करणाऱ्यांचा गौरविण्यात येणार आहे. त्यात वन आणि पशु संवर्धनात मोलाची कामगिरी केल्याबद्दल शासनाने सुवर्णपदक देऊन गौरवलेले सुजय कोळी, मराठी ग्रंथसंग्राहलय ठाणेचे अध्यक्ष विद्याधर ठाणेकर, सिनेनाट्य कलावंत विनोद नाखवा, समाजसेवक जमीर कोळी, क्रिकेटपटू सम्राट नाखवा, दीर्घ पल्ल्याचे धावपटू दर्शन कोळी, मिनेश आणि गुंजन कोळी दांपत्य, किकबॉक्सर आनंदिता कोळी, पॉवरलिफ्टर आर्या झावडे, स्केटर रिद्धी कोळी, बॅडमिंटनपटू ओम कोळी यांच्यासह शैक्षणिक विभागात भरीव कामगिरी करणारी समृद्धी कोळी यांना यावेळी सन्मानित करण्यात येईल. सांस्कृतिक कार्यक्रमात ख्यातनाम सॅक्सफोन वादक नागेश कोळी समाजातील दिवंगत शाहीर रमेश नाखवा यांना अनोख्या पद्धतीने आदरांजली वाहणार आहेत. याशिवाय कोळी गाणी , नृत्ये आणि यंदा प्रथमच समाजातील बँडवादक एकत्रित बँडवादन करणार आहेत. हा कोळी महोत्सव यशस्वी करण्यासाठी अनेकांचे हातभार लागले असून ठाणेकरांनी मोठया संख्येने उपस्थित राहून या महोत्सवाचा आनंद लुटावा असे आवाहन चेंदणी कोळीवाडा सांस्कृतिक कलामंचाचे विक्रांत कोळी यांनी केले आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading