घर सोडून गेलेल्या शाखा प्रमुखाचा शोध घेण्याची भारतीय जनता पक्षाची विधानसभेत मागणी

जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था ढासळली असून, शिवसेना पदाधिकाऱ्याकडून सातत्याने येणाऱ्या धमक्यांमुळे शिवसेनेचा एक शाखाप्रमुख घर सोडून निघून गेला आहे. या गंभीर प्रकाराकडे भाजपाचे आमदार निरंजन डावखरे यांनी लक्ष वेधून शाखाप्रमुखाचा शोध घेण्याचे राज्य सरकारला निर्देश देण्याची सभापतींकडे विनंती केली. ठाण्यातील शिवसैनिक मनोज नारकर यांना जेरी डेव्हिड याच्याकडून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. त्याचे मित्र आणि नातेवाईकांना त्रास दिला जात आहे. या प्रकाराला कंटाळून मनोज नारकर हे निघून गेले. त्यांनी घर सोडताना लिहिलेल्या चिठ्ठीत जेरी डेव्हिड याचा उल्लेख केला आहे. जेरी डेव्हिडकडून पैसा आणि सत्ता या जोरावर पोलिस प्रशासन आपल्या खिशात असल्याचा दावा केला जात असल्याचे मनोज नारकर यांनी नमूद केले आहे. या प्रकरणी पोलिसांनी केवळ व्यक्ती हरविल्याची तक्रार दाखल केली आहे. ठाण्यात शिवसेनेचे पालकमंत्री आहेत. अशा परिस्थितीत शिवसेनेचा एखादा शाखाप्रमुख असुरक्षित असेल, तर कायदा सुव्यवस्था कुठे पोचली आहे हे दिसत आहे, याकडे आमदार निरंजन डावखरे यांनी लक्ष वेधले. तसेच मनोज नारकर यांचा शोध घेण्यासाठी मोहीम हाती घेण्याची विनंती केली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading