शासनाने गृहनिर्माण संस्थांच्या आवारात घर कामगार आणि वाहनचालकांना प्रवेश प्रतिबंधित केलेला नाही. त्यामुळे गृहनिर्माण संस्थांच्या आवारात काम करणाऱ्यांना, कामगारांना गृहनिर्माण संस्थांनी प्रवेश नाकारू नये असे आवाहन सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले. कोविड -19 च्या पार्श्वभूमीवर शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या सूचनांमध्ये घर कामगार, वाहनचालक यांना गृहनिर्माण संस्थांच्या आवारात कामकाजाकरिता प्रवेश प्रतिबंधित केलेला नाही. मात्र काही गृहनिर्माण संस्था या कामगारांना प्रवेश प्रतिबंधित करत आहेत. तसेच गृहनिर्माण संस्थांचे पदाधिकारी संस्थांच्या स्तरावर शासनाच्या निर्देशाच्या विपरीत नियमावली तयार करत असल्याच्या सभासदांच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. कामगारांना प्रवेश देण्यासंदर्भात गृहनिर्माण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे. तसेच शासन नियमांच्या विपरीत गृहनिर्माण संस्थांनी नियम तयार करू नयेत अशा सूचनाही पाटील यांनी केल्या आहेत.