गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या तक्रारीवरून कालिचरण बाबावर गुन्हा

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबाबत आक्षेपार्ह टिप्पणी करणारा तथाकथित संत कालिचरण याच्यावर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या फिर्यादीवरून नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रायपूर येथे झालेल्या धर्मसंसदेमध्ये तथाकथित संत कालिचरण याने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यावर आक्षेपार्ह टीका करून नथुराम गोडसे याचे उदात्तीकरण केले होते. त्यामुळे सबंध देशभर संताप व्यक्त केला जात आहे. ही टीका करून कालिचरण याने सबंध देशवासियांचा अवमान केला आहे. त्याबद्दल जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात धडक दिली. तसेच कालिचरण यांच्याविरोधात फिर्याद दाखल केली. रायपूर येथे महात्मा गांधी यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधाने कालिचरण बाबा याने केली आहेत. ही विधाने करीत असताना त्याने नथुराम गोडसेचे समर्थन करताना आपल्या विधानाचेही समर्थन करताना आपल्या वाटेत येणाऱ्या लोकांना कापून टाकण्याची धमकी दिली आहे. या आधीही कालिचरण बाबाने धार्मिक द्वेष पसरवणारी भाषणे केली आहेत. फॅसिझमच्या विरुद्ध मैदानात उतरून लढावच लागेल. गोडसेच्या पाठीराख्यांना कायद्याच्या तरतुदीनुसार अद्दल घडवावी लागेल. त्यामुळेच आपण स्वतः दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक न ठेवता कालीचरण बाबा विरुद्ध नौपाडा पोलीस स्टेशन ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे. ही विचारांची लढाई आहे आणि आपण ही लढाई लढणार आहोत असे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading