गुडविन ज्वेलर्सचे मालक अकराकरण बंधूंचा जामीन न्यायालयाने फेटाळला

ठाणे,डोंबिवलीसह महाराष्ट्रातील हजारो गुंतवणुकदारांना गंडा घालणाऱ्या गुडविन ज्वेलर्सचे मालक सुनीलकुमार आणि सुधीरकुमार अकराकरण या दोघा बंधूंचा जामिन अर्ज शनिवारी ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती आर.व्ही. ताम्हणेकर यांनी फेटाळला.१७६ कोटींची फसवणुक केल्याप्रकरणी ११ गुन्हे दाखल असल्याने तसेच गुंतवणुकदारांची संख्या मोठी असल्याने जामिन मिळता कामा नये असा युक्तीवाद सरकारी वकील विवेक कडु यांनी न्यायालयात केला. गेल्यावर्षी ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर गुडविन ज्वेलर्सच्या गुंतवणूकदारांच्या फसवणुकीचा भांडाफोड झाल्याने ठाण्यासह महाराष्ट्रभर खळबळ उडाली होती. केरळ मधील त्रिचूर जिल्ह्यात मूळगाव असलेले सुनीलकुमार आणि सुधीरकुमार अकराकरण या दोघा बंधूंनी गुडवीन ज्वेलर्सच्या शाखा उघडुन अधिक व्याजाचे प्रलोभन दाखवणाऱ्या बोगस योजना राबवल्या.त्याद्वारे हजारो गुंतवणुकदारांना सुमारे १७७ कोटींचा गंडा घालुन ऐन दिवाळीत २१ ऑक्टोबर २०१९ मध्ये दुकाने बंद करून कुटुंबकबिल्यासह पसार झाले होते.याप्रकरणी,गुडवीनचे मालक सुनीलकुमार अकराकरण, सुधिरकुमार अकराकरण या दोघा भावांसह सचिव सचिन चौधरी, गुडवीनचे व्यवस्थापक वेणुगोपाल, सुब्रमन्यम मेनन आणि प्रदीप यांच्याविरोधात विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. गेल्यावर्षी डिसेंबरमध्येच दोघेही भामटे बंधू शरण आल्याने आर्थिक गुन्हे शाखेने त्यांना अटक करून कोठडीत डांबले.याप्रकरणी जामिनावर मूक्तता व्हावी यासाठी या भामटयांनी ठाणे न्यायालयात अर्ज केला होता.त्यावरील सुनावणीत,अशा प्रकारच्या गुन्ह्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूकदारांची फसवणुक झाली असून,गुंतवणूकदारांचे हित जोपर्यंत सुरक्षित राहत नाही, तोपर्यंत आरोपींची जामिनावर सुटका करता येणार नाही.असे स्पष्ट करीत न्यायमूर्ती ताम्हणेकर यांनी त्यांचा जामिनअर्ज फेटाळला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading