कोविड आणि इन्फ्लुएंझा साथीचा प्रतिबंध तसंच बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी आरोग्य यंत्रणेने सतर्क रहावे : महापालिका आयुक्त

सद्यस्थितीत कोविडचा वाढत असलेला प्रादुर्भाव लक्षात घेता या आजाराचा प्रतिबंध व्हावा आणि बाधित रुग्णांना वेळीच योग्य उपचार मिळावेत यासाठी ठाणे महापालिकेची आरोग्ययंत्रणा सज्ज झाली आहे. कोविडबाधित रुग्णांसाठी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात रुग्णांसाठी विलगीकरण कक्ष, बेडस्, गरज पडल्यास ऑक्सिजन यंत्रणा, डॉक्टर्स, परिचारिका, औषधे यांची कोणतीही कमतरता भासणार नाही या दृष्टीने आरोग्य विभागाने सतर्क रहावे. सार्वजनिक ठिकाणी तसेच बाजारपेठ, रेल्वे स्टेशन या गर्दीच्या ठिकाणी अँटीजेन चाचण्यांची संख्या वाढविण्याचे निर्देश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी संबंधित विभागाला दिले आहेत. महापालिका आयुक्तांनी कोविडच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागासमवेत आढावा बैठक घेतली. कोविडचा प्रतिबंध करण्यासाठी महापालिकेच्या सर्व नागरी आरोग्यकेंद्रावर दैनंदिन कोविडच्या चाचण्या सुरू केल्या असून महापालिका हद्दीत 1 ते 16 मार्चपर्यत 85 रुग्ण हे कोविडबाधीत आढळून आले आहेत. त्यापैकी 80 सक्रिय रुग्ण हे होम क्वारंटाईन असून 3 रुग्ण छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार घेत आहेत तर 2 रुग्ण खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. तसेच जे रुग्ण होम क्वारंटाईन आहेत, त्यांचीही लक्षणे सौम्य असल्याचे यावेळी सांगण्यात आले. ज्या रुग्णांच्या घरी एकच शौचालय असेल आणि वेगवेगळे राहण्याची सोय नसेल अशा रुग्णांसाठी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात 15 बेडचा विलगीकरण कक्ष तयार करण्यात आला आहे. तर 5 बेड हे आयसीयूचे ठेवण्यात आले आहेत. जर रुग्णसंख्या वाढली तर त्या प्रमाणात बेडची व्यवस्था, विलगीकरणाची व्यवस्था तातडीने करणे, दैनंदिन तपासण्या 2500 पर्यत वाढविणे, तसेच आरटीपीसआर चाचण्या देखील प्रभावीपणे सुरू ठेवण्याच्या सुचनाही आयुक्तांनी दिल्या. कोविडबाधीत रुग्णांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी जर आरोग्यकेंद्रात चाचणी केल्यानंतर रुग्ण बाधित आढळला तर त्याला छत्रपती शिवाजी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यासाठी 24X7 रुग्णवाहिका उपलब्ध ठेवावी, रुगण दाखल झाल्यानंतर त्याची माहिती नातेवाईकांना देणयासाठी हेल्प डेस्क तयार करावा. आगामी काळात अँटीजेन चाचण्यांची संख्या वाढविण्यात येणार असून त्याप्रमाणात ॲटीजेन किटची संख्याही वाढविण्यात यावी यासाठीची निविदा प्रक्रिया प्राधान्यक्रमाने पूर्ण करावी. तातडीची बाब म्हणून छत्रपती शिवाजी महाराज रुगणालयाचे अधिष्ठाता यांच्या अखत्यारित एक लाख रुपयांपर्यतची रोकड उपलब्ध करावी जेणेकरुन कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही असेही आयुक्तांनी नमूद केले. कोविडबाधीत रुग्णांपैकी एखाद्या रुग्णास डायलेसीसची आवश्यकता असल्यास छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात डायलेसीस मशीनची सोय उपलब्ध करावी. तसेच पार्किंग प्लाझा येथील डायलेसीस मशीन कळवा रुग्णालयात हलविण्यात याव्यात अशा सूचनाही या बैठकीत दिल्या. तसेच कोविड बाधित रुग्णाच्या कुटुंबातील सदस्यांची आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींची ॲटीजेन, आरटीपीसीआर तपासणी देखील प्राधान्यक्रमाने करावी. या प्रक्रियेमध्ये संबंधितांचे सहकार्य न मिळाल्यास संबंधित प्रभाग समितीच्या सहायक आयुक्तांच्या मदतीने तपासणी करण्यात यावी. कोविडचा प्रसार वाढू नये यासाठी बाधित रुग्णाच्या कुटुंबियांनी महापालिकेस सहकार्य करावे असे देखील यावेळी आयुक्त बांगर यांनी सूचित केले.
H3N2 इन्फलुएंझा या आजाराचे देखील सहा रुग्ण आढळून आले आहे, घसा दुखणे, नाक वाहणे किंवा चोंदणे, ताप येणे, थकवा जाणवणे अशी कोविडसदृश्य लक्षणे असून अशी लक्षणे आढळल्यास संबंधित व्यक्तीने जवळच्या आरोग्यकेंद्रात संपर्क साधावा तसेच आवश्यक त्या तपासण्या कराव्यात, अंगावरती आजार काढू नयेत असेही आयुक्तांनी नमूद केले.
कोविडबाधीत रुग्ण उपचारार्थ दाखल झाल्यानंतर त्यांच्या आवश्यक त्या तपासण्या करण्यासाठी रुग्णालयातच अद्ययावत पॅथॉलॉजी लॅब उभारुन त्या मार्फत सर्व चाचण्या होतील या दृष्टीने तातडीने कार्यवाही करावी.
खारेगांव विभागात 15 तर मुंब्रा विभागात 10 कोविडबाधित रुग्ण आढळून आले आहेत. या पार्श्वभूमीवर दोन्ही विभागात जास्तीत जास्त नागरिकांची अँटीजेन तपासणी होईल या दृष्टीने चाचण्यांची संख्या वाढविण्याचे निर्देश दिले.
महापालिका कार्यक्षेत्रात कोविड आणि H3N2 चे रुग्ण आढळून आले असले तरी यावर तातडीने प्रतिबंध व्हावा यासाठी महापालिकेने संपूर्णत: तयारी केली असून या आजाराची लक्षणे आढळल्यास नागरिकांनी कोणत्याही अफवेवर विश्वास न ठेवता व न घाबरता आपल्या जवळच्या आरोग्यकेंद्रात संपर्क साधावा.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading