कोविडच्या नियमांचे पालन करुन यंदाचा गणेशोत्सव साजरा करण्याचं महापौरांचं आवाहन

कोरोनाची दुसरी लाट जरी ओसरत असली तरी तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेवून यंदाही सार्वजनिक गणेशोत्सव हा शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आणि महापालिकेने आखून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करुन उत्साहात साजरा करण्याचे आवाहन महापालिकेच्या वतीने महापौर नरेश म्हस्के यांनी केले आहे. करोनाची तिसरी संभाव्य लाट लक्षात घेवून सार्वजनिक गणेशोत्सवाच्या आयोजनाबाबत आज महापौरांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. कोविड मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थ‍ितीचा विचार करुन यंदाही शासनाच्या नियमावलीनुसार गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. श्री गणेशाची मूर्ती ही सार्वजनिक मंडळाकरिता 4 फूट आणि घरगुती गणपतीकरिता 2 फूटांपर्यत असणे आवश्यक आहे. तसेच सार्वजनिक गणेश मंडपांसाठी लागणाऱ्या महापालिका आणि अग्निशामक दल, महावितरण तसेच पोलीस आणि वाहतूक विभागाकडून देण्यात येणाऱ्या परवानग्या ह्या विनाविलंब मिळतील या दृष्टीने कार्यवाही करावी. तसेच ज्या गणेश मंडळांची अनामत रक्कम महापालिकेकडे जमा आहे, तीच रक्कम यंदाही ग्राह्य धरण्यात यावी याबाबतच्या सूचना महापौरांनी दिल्या. गणेशमंडळांनी मंडपांमध्ये निर्जंतुकीकरणाची, थर्मल स्क्रीनिंगची व्यवस्था तसेच सोशल डिस्टन्सींग, स्वच्छतेचे नियम पाळणे आवश्यक आहे. सांस्कृतिक कार्यक्रमाऐवजी आरोग्यविषयक उपक्रम, शिबिरे आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू आदी आजार आणि प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करण्यात यावी. कोरोनाची पार्श्वभूमी लक्षात घेता गणेशाचे आगमन आणि विसर्जन मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. तसेच विसर्जनाच्या पारंपरिक पध्दतीत विसर्जनस्थळी होणारी आरती घरीच करुन विसर्जनास्थळी कमीत कमी वेळ लागेल या दृष्टीने मंडळांनी नियोजन करावे. सार्वजनिक गणेश मंडळांच्या मूर्तीचे विसर्जन वेळेत होईल या दृष्टीने महाघाटावर पोहचता येईल या दृष्टीने नियोजन करुन महापालिकेस सहकार्य करावे अशाही सूचना या बैठकीत देण्यात आल्या. कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत आणि पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय, शिक्षण विभाग तसेच संबंधित महापालिका, पोलीस व स्थानिक प्रशासनाने विहित केलेल्या नियमांचे पालन करुन गणेशोत्सव हा साध्या पध्दतीने साजरा करावा असे आवाहन महापौर नरेश म्हस्के यांनी केले आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading