कोर्टनाका येथे अशोक स्तंभाची उभारणी

भावी पिढीला ठाणे शहराचा ऐतिहासिक वारसा माहिती व्हावा यासाठी स्वातंत्र्यलढ्यात ठाणेकरांच्या योगदानाचे प्रतिक असलेल्या अशोक स्तंभ कोर्ट नाका येथे उभारण्यात आला आहे. या स्तंभाचे अनावरण काल झालं. स्वातंत्र्य लढ्यातील स्वातंत्र्यवीरांच्या योगदानाचे प्रतिक म्हणून कोर्ट नाका येथे अशोक स्मृती स्तंभ उभारण्यात आला होता. मात्र १९८३ मध्ये कळव्याच्या दिशेने येणार्‍या एका ट्रक च्या धडकेत हा स्तंभ उध्दवस्त झाला होता. स्वातंत्र्याची ही स्मृती चिरंतन रहावी यासाठी ठाणेकरांच्या भावना लक्षात घेऊन आमदार संजय केळकर यांनी यासाठी ठाणे महापालिकेकडे पाठपुरावा केला होता. आमदार केळकर यांच्या आमदार निधीतून हा स्तंभ उभारण्यात आला. या स्तंभात देशाचा तिरंगा झेंडा हातात घेवून जाणारे जवान आणि भारतीय संविधानाची प्रतिमा साकारण्यात आली आहे. या स्तंभाचे अनावरण लवकरच होणार आहे. देशाला १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाले. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात ठाणेकरांचे मोठे योगदान होते. या लढ्याच्या खुणा ठाणे शहरात आहेत. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्वातंत्र्यलढ्यात सहभागी असणार्या ठाणेकरांच्या स्मृती जतन करण्याच्या उद्देशान ज्येष्ठ स्वातंत्रता सेनानी दत्ताजी ताम्हाणे आणि अन्य स्वातंत्र्यता सेनानी यांनी मिळून १९५२ मध्ये स्वातंत्र्यालढ्यातील योगदानाचे प्रतीक म्हणून अशोक स्तंभाची उभारणी केली होती. ठाण्याचे तत्कालीन नगराध्यक्ष तारापोरवाला यांनी या अशोकस्तंभ उभारणीला परवानगी दिली होती. तत्कालीन मंत्री डॉ. हिरे यांच्या हस्ते या प्रतिकाचे उद्घघाटनही करण्यात आले होते. ठाणेकरांच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाचे हे प्रतिकात्मक स्मारक हे ठाणेकरांसाठी भूषण ठरले होते. मात्र १९८३ मध्ये एका ट्रकच्या धडकेने हे स्मारक नेस्तनाबूत झाले होते. जुने ठाणेकर अनेकदा या स्मारकांच्या स्मृती जागवत असत. पण प्रशासकीय अनास्थेमुळे हे स्मारक ठाणेकरांच्या विस्मृतीत गेले होते. ठाण्याच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाचे साक्षीदार असलेल्या अशोकस्तंभाच्या प्रतिकाची पुर्नउभारणी करण्यासाठी आमदार केळकर २०१६ पासून ठाणे महापालिकेकडे पाठपुरावा करत होते. 3 वर्षांनंतर त्यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले. या कामासाठी ठाणे महापालिकेने सुमारे ६० लाखांचा निधी दिला आहे. हा स्तंभ शिल्पकार श्रेयस खानविलकर यांनी साकारला आहे. हा स्तंभ सुमारे ३५ फूट उंचीचा असून यात ३ शिल्पांचा समावेश आहे. ठाणेकरांचे योगदान असल्याने आणि ठाण्याची भौगोलिक पार्श्‍वभूमी लक्षात घेवून बोटीमध्ये स्वार असलेले हातात झेंडा घेतलेले स्वातंत्रसेनानींचा समावेश आहे. त्याचबरोबर घटनेच्या उद्दिष्ट असलेल्या कोनशीलेचाही यात समावेश आहे. एफ. आर. पी. तंत्रज्ञानात हे शिल्प साकारण्यात आली आहेत. विशेष म्हणजे ज्या नीळकंठ खानविलकर यांनी विधान भवनातील अशोक स्तंभ १९८० मध्ये साकारले, त्यांचाच मुलगा श्रेयस खानविलकर यांनी हा अशोकस्तंभ साकारला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading