कोरोना सर्वेक्षणाच्या कामातून अखेर शिक्षकांना दिलासा

कोरोना सर्वेक्षणाच्या कामातून शिक्षकांना दिलासा देण्याच्या मागणीला महापालिका आयुक्तांनी मंजुरी दिल्यानं शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेले ३ ते ४ महिने ठाणे महापालिका हद्दीतील जवळपास २ हजार शिक्षक कोरोना सर्व्हेक्षणाचे काम करीत होते. शैक्षणिक वर्ष सुरू झाले तरी शिक्षक कोरोना सर्व्हेक्षणाच्या कामात गुंतल्यामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षणच बंद झाले होते. शिक्षक सेनेचे ठाणे शहर अध्यक्ष दिलीप डुंबरे यांनी महापालिका आयुक्त विपीन शर्मा यांना पत्र लिहून शिक्षकांना कार्यमुक्त करण्याची मागणी केली होती. अखेर आज महापालिका आयुक्तांनी शिक्षकांच्या कार्यमुक्तीला मंजुरी दिल्याने शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे. यामध्ये प्रशासनाने माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयीन ४१३ शिक्षकांना कार्यमुक्त केले आहे. तसेच वय वर्षे ५५ पुढील, दुर्धर आजार असलेले तसंच दिव्यांग असलेल्या ३०० शिक्षकांना कार्यमुक्त केले आहे. उर्वरित खाजगी प्राथमिक आणि पालिका शाळेतील शिक्षकांना ७ दिवस काम आणि ७ दिवस सुट्टी अशा पध्दतीने सर्व्हेक्षणाचे काम दिले जाणार आहे. तर मनुष्यबळ उपलब्ध होताच टप्प्याटप्प्याने सर्वच शिक्षकांना कार्यमुक्त केले जाणार आहे. तसेच शिक्षकांची विनामूल्य कोव्हिड टेस्ट करावी आणि शिक्षकांवर विनामूल्य उपचार करण्यात यावेत या संघटनेच्या मागण्याही मंजूर करण्यात आल्या असल्याची माहिती दिलीप डुंबरे यांनी दिली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading