कोरोना लसीवरून भारतीय जनता पक्ष चुकीचं राजकारण करत असल्याचा महापौरांचा आरोप

भारतीय जनता पक्षामध्ये बातम्यांमध्ये येण्यासाठी स्पर्धा लागली असून एकाच विषयावर वेगवेगळे नगरसेवक पत्रकं काढत असल्याची टीका महापौर नरेश म्हस्के यांनी केली आहे. भारतीय जनता पक्षाच्या मनोहर डुंबरे यांनी नियम डावलून महापौरांनी कोरोना लस घेतल्याचा आरोप केला होता. त्यावर बोलताना महापौरांनी ही टीका केली. वृत्तपत्रांमधून मनोहर डुंबरे यांना नरेश म्हस्केंनीच गटनेता केल्याचा आरोप झाला होता. म्हणून आपणही नरेश म्हस्केंच्या विरोधात बोलू शकतो हे दाखवण्यासाठी डुंबरे यांनी हे पत्रक काढल्याचा आरोप म्हस्के यांनी यावेळी बोलताना केला. महापालिकेमध्ये सर्व नगरसेवकांना लस देण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसारच नोंद करून लस घेतल्याचं महापौरांनी सांगितलं. कोरोना काळामध्ये अगदी सर्वच पक्षाच्या नगरसेवकांनी अन्नधान्य पोहचवण्यापासून अंत्यसंस्कारापर्यंत अनेक कामं केली. त्यामुळं लोकप्रतिनिधी हे फ्रंटलाईन वर्कर नाहीत का असा प्रश्न म्हस्के यांनी उपस्थित केला. भारतीय जनता पक्ष हे सर्व प्रकार राजकारणासाठी करत आहे. लोकांच्यात विश्वास निर्माण करण्यासाठी लस घेतली असाही दावा महापौरांनी यावेळी केला. आम्ही अन्नछत्रांच्या नावावरती कोणाच्या जमिनी लाटल्या नाहीत आता तेही आम्ही बाहेर काढत आहोत असं सांगून भारतीय जनता पक्षानं चुकीच्या पध्दतीनं राजकारण करू नये असा टोला नरेश म्हस्के यांनी लगावला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading