कोरोना निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्या ५४४ वाहनचालकांविरोधात कारवाई

कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने ‘ब्रेक द चेन’ ही मोहिम सुरू केली असून त्या अंतर्गत लागू केलेल्या निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांच्या विरोधात ठाणे वाहतूक पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे. सोमवारी पहिल्याच दिवशी ५४४ वाहनचालकांच्या विरोधात ही दंडात्मक कारवाई झाली. फ्रंट सीट, ट्रीपल सीटसह मंजूर क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक करणे आणि अन्य निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्यांचा समावेश आहे. ही कारवाई यापुढे नियमितपणे सुरू राहणार आहे. ती टाळण्यासाठी राज्य सरकारने लागू केलेल्या निर्बंधांचे काटेकोर पद्धतीने पालन करावे, असे आवाहन वाहतूक पोलिसांच्यावतीने करण्यात आले आहे. राज्यभरात कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत असून ती रोखण्यासाठी सरकारने ५ एप्रिलपासून कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. ऑटो रिक्षामध्ये चालक आणि दोन प्रवासी यांना परवानगी देण्यात आली असून टॅक्सी किंवा अन्य चारचाकी वाहनांमध्ये वाहनाच्या क्षमतेच्या ५० टक्के प्रवाशांनाच प्रवासाची मुभा आहे. बसमध्ये उभे राहून प्रवास करण्यास मनाई आहे. सार्वजनिक वाहतूकीने प्रवास करणाऱ्या व्यक्तीस मास्कचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे. या वाहतूक व्यवस्थेतील चालक आणि अन्य कर्मचाऱ्यांचा प्रवाशांशी संपर्क येतो. त्यामुळे त्यांनी लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच, १० एप्रिलनंतर त्यांना कोरोना निगेटीव्ह असल्याचा रिपोर्ट सोबत बाळगणे क्रमप्राप्त आहे. दर १५ दिवसांनी अशा आरटीपीसीआर चाचण्या करून त्याचे प्रमाणपत्र या लोकांना सोबत बाळगावे लागणार आहे. ते प्रमाणपत्र नसेल तर रिक्षा आणि टॅक्सीत वाहनचालक आणि प्रवासी बसण्याच्या जागेत पार्टीशन करावे लागणार आहे. सरकारच्या आदेशानंतर ठाण्याचे पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांनीसुध्दा त्याआधारे ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या हद्दित लागू असलेल्या निर्बंधांचे सुस्पष्ट आदेश जारी केले आहेत. मात्र, त्यानंतरही काही व्यक्तींकडून या निर्बंधांचे उल्लंघन होताना दिसत आहे. त्यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. सोमवारी राबवविलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत २० ट्रिपल सीट वाहनचालक, १६१ फ्रंट सीट आणि पोलिसांनी कलम १७९ अन्वये लागू केलेल्या आदेशांचे उल्लंघन करणाऱ्या ३५४ अशा एकूण ५४४ वाहनचालकांच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे. ठाणे वाहतूक पोलिसांच्या १८ विभागांसह २२ पथकांनी केलेल्या या कारवाईत निर्बंधांचे उल्लंघन करणारे सर्वाधिक वाहनचालक मुंब्रा (११४) परिसरात आढळले आहेत. त्या खालोखाल भिवंडी (४९), नौपाडा (४९), नारपोली (४९), वागळे (३९), उल्हासनगर (३०), डोंबिवली (२८), राबोडी (२७), अंबरनाथ (२६), कोनगाव (२५), कल्याण (१३), कोळशेवाडी (१३) या ठिकाणी कारवाई करण्यात आली. कोरोनाचे वाढते संक्रमण रोखण्यासाठी शासनाने लागू केलेल्या निर्बंधांचे काटेकोर पालन करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. त्यामुळे वाहनचालक त्या आदेशांचे पालन करून यापुढे होणारी कारवाई टाळतील अशी अपेक्षा आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading