कोरोनाचा प्रादुर्भाव थांबवण्यास राज्य शासनाचं सर्वोच्च प्राधान्य – कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश

कोरोनाचा प्रादुर्भाव थांबवण्यास राज्य शासनाचं सर्वोच्च प्राधान्य असून साथ प्रतिबंध कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी सर्व जिल्हा यंत्रणेची असून त्याची काटेकोर अंमलबजावणी करावी असे आदेश पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. कोरोना संदर्भात करावयाच्या कार्यवाहीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात एक आढावा बैठक झाली त्यावेळी त्यांनी हे आदेश दिले. प्रशासनातील सर्वच घटकांनी मार्गदर्शक सूचनांनुसार आपापली जबाबदारी पार पाडावी, यामध्ये कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही असा इशारा त्यांनी दिला. नागरिकांच्या आरोग्याला प्राधान्य द्यावं, जे रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत त्यांच्यासाठी मानसिक आधार देण्याची आवश्यकता असून क्वॉरन्टाईन केलेल्या ठिकाणी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशा सूचना एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिल्या. कोरोना संदर्भात सर्व यंत्रणांनी मिशन मोडमध्ये काम करणं गरजेचं आहे. सर्वच संशयितांची माहिती घेऊन त्याबाबतचे निर्णय घ्यावेत तसंच या काळात वैद्यकीय विभागांना प्रशासकीय सहकार्य करावं अशा सूचनाही त्यांनी केल्या. मागणीनुसार रूग्णवाहिका सेवा सुसज्ज ठेवाव्यात, वैद्यकीय साधनसामुग्रीच्या साठ्याबाबत आढावा घ्यावा, आवश्यक तिथे पोलीस विभागानं सहकार्य करावं, रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मास्क आणि सॅनिटायझर उपलब्ध करून द्यावेत असं पालकमंत्र्यांनी सांगितलं. कोरोनाचा प्रादुर्भाव पसरू नये याकरिता राज्यातील धार्मिक उत्सव रद्द करावेत, सर्व धर्मीय प्रार्थनास्थळांमध्ये दैनंदिन पूजाअर्चा आणि धार्मिक विधीशिवाय भाविकांना प्रवेशास प्रतिबंध करावा असंही पालकमंत्र्यांनी स्पष्ट केलं. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उद्योजकांनी औद्योगिक घटकांमध्ये काम करणा-या अधिकारी आणि कर्मचा-यांना शक्य असल्यास वर्क फ्रॉम होमची मुभा द्यावी असं आवाहनही पालकमंत्र्यांनी यावेळी केलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading