कोपरी रेल्वे ब्रीजच्या कामासाठी आज रात्री ११ ते उद्या सकाळी ६ वाजेपर्यंत पूर्व द्रूतगती महामार्गावरील वाहतूक सात तासांसाठी बंद

कोपरी रेल्वे ब्रीजच्या कामासाठी आज रात्री ११ ते उद्या सकाळी ६ वाजेपर्यंत पूर्व द्रूतगती महामार्गावरील वाहतूक सात तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. या काळात अन्य पर्यायी मार्गांचा वापर करावा असं आवाहन ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेनं केलं आहे. मुंबई महानगर विकास प्राधिकरणाकडून कोपरी ब्रीजच्या कामासाठी ज्ञानसाधना महाविद्यालय आणि कोपरी पूर्व या मार्गाला जोडणारा ब्रीज काढण्यात येणार आहे. या कामासाठी मोठी क्रेन मागवण्यात आली असून मुंबई ते ठाणे आणि ठाणे ते मुंबई दोन्ही मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचं आवाहन केलं आहे. मोठ्या वाहनांना नाशिक-मुंबई महामार्गाने ठाणे शहरातून मुंबई पूर्व द्रूतगती मार्गाने जाणा-या वाहनांना खारेगाव टोलनाका येथे प्रवेश बंद केला आहे. त्याऐवजी ही वाहने पारसिक रेतीबंदर, मुंब्रा बायपास येथून ऐरोली ब्रीजमार्गे जातील. तसंच ठाण्यातून मुंबई पूर्व द्रूतगती मार्गाने जाणा-या मोठ्या वाहनांना गोल्‍डन क्रॉस ब्रीजखाली प्रवेश बंद केला आहे. त्याऐवजी ही वाहने माजीवडा ब्रीजवरून खारेगाव टोलनाका इथून पारसिक रेतीबंदर मार्गे ऐरोली ब्रीजकडे जातील. लहान वाहनांना नौपाडा सर्व्हीस रोड महालक्ष्मी मंदिरासमोरून कोपरी ब्रीजकडे जाण्यास प्रवेश बंद आहे. त्याऐवजी साकेत इथून शिवाजी चौक, कळवा विटावा मार्गे मुंबईकडे जातील. तर घोडबंदर रोड आणि ठाण्यातून जाणारी लहान वाहनं तीन हात नाका येथून मॉडेला चेकनाका मार्गे मुंबईत जातील असं वाहतूक शाखेकडून कळवण्यात आलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading